रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:23 IST2021-02-05T04:23:41+5:302021-02-05T04:23:41+5:30
१ फेब्रुवारीपासून लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. त्याला रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. ...

रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील
१ फेब्रुवारीपासून लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. त्याला रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. या संदर्भात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट केले आहे.
गोयल यांनी म्हटले आहे की, मुंबईकरांनो, आपल्या सुविधेसाठी १ फेब्रुवारीपासून मुंबई लोकल ट्रेन सर्वसामान्य लोकांसाठी सुरू हाेईल. पहिली लोकल सुरू झाल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत आणि त्यानंतर रात्री नऊ वाजेपासून शेवटच्या लोकलपर्यंत सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार सकाळी ७ ते १२, तसेच दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई लोकल केवळ आवश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठीच चालविल्या जातील. या वेळेत सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी नसेल. प्रवासादरम्यान आपण कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहनही गोयल यांनी केले.
..................
राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव आम्हाला दिला होता. आम्ही तो रेल्वे बोर्डाकडे पाठविला असून त्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
.........................................
रेल्वे सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. काही एक्सलेटर आणि प्रवेशद्वारे बंद होती, ती सुरू करण्यात येणार आहेत. तसेच एटीव्हीएमची संख्या वाढविण्यात येईल.
- सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे