सखी मंच सभासद नोंदणीला उदंड प्रतिसाद
By Admin | Updated: February 7, 2015 22:54 IST2015-02-07T22:54:47+5:302015-02-07T22:54:47+5:30
लोकमतने सखी मंचच्या माध्यमातून महिलांसाठी स्वतंत्रपणे व्यासपीठ तयार करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन उरणचे आमदार मनोहरशेठ भोईर यांनी केले.

सखी मंच सभासद नोंदणीला उदंड प्रतिसाद
उरण : महिलांमध्ये दडलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना संसाराच्या रहाटगाड्यातून थोडीशी का होईना उसंत मिळावी यासाठी लोकमतने सखी मंचच्या माध्यमातून महिलांसाठी स्वतंत्रपणे व्यासपीठ तयार करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन उरणचे आमदार मनोहरशेठ भोईर यांनी केले. उरण येथे आयोजित सखी मंच सभासद नोंदणी कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. लोकमतच्या या संखीमंचच्या कार्यक्रमाला महिलांनीही भरघोस प्रतिसाद दिला.
उरण गणपती चौकातील ब्राह्मण सभा हॉलमध्ये लोकमत सखी मंचच्यावतीने सभासद नोंदणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमदार मनोहरशेठ भोईर, रायगड जिल्हा काँगे्रसचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उरण महिला नागरी पतपेढीच्या अध्यक्षा विभावरी पाडगावकर, उरण सखी मंचच्या प्रतिनिधी मंजिरी पाडगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमास सुमारे दोनशे महिला सहभागी झाल्या होत्या.
विशेष म्हणजे ८६ वर्षीय विभावरी पाडगावकर या उत्साहात या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यांचा उत्साह पाहण्याजोगा असाच होता. त्याच्या या वयातील उत्साहाला आमदारांसह सर्वांनीच टाळ्यांच्या गजरात दाद दिली. आयोजित सखी मंचच्या कार्यक्रमाचा समारोप आ. मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते झाले. संसारात गृहिणी रममाण असतात. संसाराचा रहाटगाडा उपसण्यात त्या इतक्या गढून गेलेल्या असतात की त्यांना स्वत:कडे असलेल्या सुप्त कलागुणांचाही विसर पडलेला असतो.
अशा या महिलांतील असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा यासाठी लोकमतने सखी मंचसारखे व्यासपीठ निर्माण केले आहे. महिलांसाठी लोकमतने हाती घेतलेला सखी मंचचा उपक्रम निश्चितच स्वागतार्ह असल्याचे मनोहर भोईर यांनी सांगितले. सखीमंच उपक्रमाचा लाभ अधिकाधिक महिलांनी घ्यावा असे आवाहनही भोईर यांनी केले.
यावेळी आमदार मनोहर भोईर, मिलींद पाडगावकर, विभावरी पाडगावकर यांचा तुळशीचे रोपटे देवून स्वागत करण्यात आले. तसेच सखीमंचच्या उरण प्रतिनिधी मंजिरी पाडगावकर, शोभना पटेल, संपुर्णा थळी, राजश्री गावडे, स्रेहा पोतदार, जयश्री त्यागी आदी सभासदांना भेट वस्तू आणि कुपन्स वाटपही आमदार मनोहरशेठ भोईर आणि मिलिंद पाडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात मिलिंद पाडगावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. (वार्ताहर)