Join us  

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सरकारकडून 3300 कोटींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 4:01 PM

सरकारच्या दाव्यानुसार 33 टक्क्यांपेक्षा शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

मुंबई: राज्य सरकारने गुरूवारी शेतकऱ्यांना दिलासा देणारे दोन मोठे निर्णय जाहीर केले. त्यानुसार सरकारकडून बोंडअळी आणि तुडतुडी रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकूण 3373 कोटी 71 लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सरकारच्या दाव्यानुसार राज्यातील 33 टक्क्यांपेक्षा शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र व राज्यसरकार संयुक्तपणे या निधीचा भार उचलणार आहे. 

तत्पूर्वी आज सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या थकीत विजबिलांच्या वसुलीस स्थगिती देण्याची घोषणा केली. एकीकडे शेतीमधील आर्थिक नुकसानीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढत आहे. कृषीपंपाच्या वारेमाप बिलांमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. त्यातच वीज मंडळाकडून बील थकलेल्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचा वीजपुरवठा तोडण्यात येत होता. त्यामुळे शेतीसाठीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत होता.  या सगळ्यामुळे शेतकऱ्यांना थकीत वीजबिलाचा भरणा करणेही अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. राज्य शासनाने मगील 3 वर्षात 4 लाख 64 हजार कृषीपंपांना वीज कनेक्शन दिले असून उर्वरित 2 लाख 45 हजार प्रलंबित कृषीपंपांना उच्च दाब प्रणाली मार्फत (एचव्हीडीसी) कनेक्शन देण्यात येणार असून हे काम ऑक्टोबर 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिले.  

टॅग्स :शेतकरीशेती क्षेत्र