Join us  

महापालिका शाळेतील विद्यार्थी भविष्यातील मोठे कलावंत- किशोरी पेडणेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 2:14 AM

बालकोत्सव २०१९-२० लोकनृत्य स्पर्धा

मुंबई : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरली असून आज या त्यांनी सादर केलेल्या विविध राज्यांच्या लोकनृत्यांमधून तेथील संस्कृतीचे दर्शन घडविले आहे. या नृत्यांमधील विद्यार्थ्यांच्या देहबोलीवरून ते भविष्यात मोठे कलावंत होणार असल्याचे प्रतिपादन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.

बालकोत्सव २०१९-२० निमित्त महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची अंतिम लोकनृत्य स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत दामोदर नाट्यगृह, सोशल सर्व्हिस लीग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ येथे पार पडला, या वेळी त्या बोलत होत्या.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आज या ठिकाणी सादर करण्यात आलेल्या विविध राज्यांच्या लोकनृत्यांमधून त्या त्या राज्याची संस्कृती, बोलीभाषा, सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडले. त्यांनी एकत्रितपणे सादर केलेल्या लोकनृत्यांमधून महापालिका शाळांचे विद्यार्थी कुठेच कमी नसल्याचे सिद्ध होत असून सांघिकपणाची भावना वाढीस लागली असून यातून एक चांगले वातावरण तयार होत आहे.

शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक म्हणाल्या की, विविध राज्यांच्या लोकसंस्कृतीचा जागर या ठिकाणी पाहायला मिळाला असून गोरगरीब कुटुंबातील गुणवंत असलेल्या या विद्यार्थ्यांना एक चांगले व्यासपीठ मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. शिक्षणासोबतच नृत्य, संगीत, कला यामध्ये आमचे विद्यार्थी पारंगत झाले पाहिजेत, अशी शिक्षकांची नेहमी भावना राहत असून त्याचा परिपाक म्हणजे विद्यार्थ्यांचे आजचे उत्कृष्ठ नृत्यकलेतील सादरीकरण आहे.

शिक्षणाधिकारी महेश पालकर म्हणाले, विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे, तसेच त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणे हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश आहे.विविध भाषिक शाळांतील विद्यार्थी आपली जात, भाषा, संस्कृती विसरून सांस्कृतिक कार्यक्रम, लोकनृत्य व नाट्य या विविध क्षेत्रात आपल्या कलागुणांचा आविष्कार करण्यासाठी बालकोत्सव उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.

अंतिम लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक एल विभागातील एच.पी. केळूसकर उर्दू मनपा शाळेच्या त्रिपुरा नृत्याने, द्वितीय क्रमांक एम पूर्व विभागातील शहाजीनगर मनपा हिंदी शाळेच्या कालबेलिया नृत्याने, तर तृतीय क्रमांक एच/पूर्व विभागातील खेरनगर मनपा उर्दू शाळेच्या घुसदी पावरा नृत्याने पटकाविला. उत्तम नृत्यदिग्दर्शकाचा पुरस्कार त्रिपुरा नृत्याकरिता सिद्धिकी इबीबुल्लाह यांना, तर संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार कालबेलिया नृत्याकरिता गायत्री बसेन यांनी पटकाविला.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाविद्यार्थीमुंबई