‘ग्रे हायपोकोलियस’ दुर्मीळ पक्ष्याची नोंद!
By Admin | Updated: April 7, 2015 05:19 IST2015-04-07T05:19:31+5:302015-04-07T05:19:31+5:30
कुणाल मुनसिफ या मुंबईकर पक्षीनिरीक्षकाने गुजरातमधील जामनगरलगतच्या नरारा मरिन नॅशनल पार्कात अत्यंत दुर्मीळ अशा ‘ग्रे हायपोकोलियस

‘ग्रे हायपोकोलियस’ दुर्मीळ पक्ष्याची नोंद!
मुंबई : कुणाल मुनसिफ या मुंबईकर पक्षीनिरीक्षकाने गुजरातमधील जामनगरलगतच्या नरारा मरिन नॅशनल पार्कात अत्यंत दुर्मीळ अशा ‘ग्रे हायपोकोलियस’ या पक्ष्याची नोंद केली असून, या संदर्भातील माहिती त्याने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक डॉ. असद रहमानी यांनादेखील दिली आहे.
उत्तर आफ्रिका, अरेबिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि पश्चिम भारतात ‘ग्रे हायपोकोलियस’ हा पक्षी अभावानेच आढळतो. प्रामुख्याने हा स्थलांतरित पक्षी असल्याने तो पश्चिम भारतात चार महिनेच आढळतो. या पक्ष्याला मराठी भाषेत ‘राखी बुलबुल’ या नावाने ओळखला जातो. १९३० साली मुंबईलगतच्या किहीम येथे डॉ. सालीम अली यांनी या पक्ष्याची नोंद केली होती. शिवाय २०११-१२ सालच्या सुमारास महाराष्ट्रातील तारकर्ली येथे या पक्ष्याची नोंद झाली होती. हा पक्षी स्थलांतरित असल्याने गुजरातमधील कच्छच्या आखातात तो कमी-अधिक प्रमाणात आढळतो, अशी माहिती कुणाल मुनसिफ यांनी दिली. कुणाल मुनसिफ यांना फेब्रुवारी महिन्यात ‘ग्रे हायपोकोलियस’ हा पक्षी नरारा येथे आढळून आला असून, त्याची छायाचित्रे काढण्याचे यशही त्यांना मिळाले आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या ‘जर्नल’मध्ये याची नोंद घेण्यात येणार असल्याचे डॉ. रहमानी यांनी सांगितल्याची माहिती कुणाला यांनी दिली. (प्रतिनिधी)