Join us  

मुंबईत प्रदूषणाचा आलेख चढता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2021 7:35 AM

हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट : आजारी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : धूर आणि धूळ यांच्या मिश्रणाने तयार झालेल्या धूरक्याने मुंबईकरांच्या नाकीनऊ आणले असून, नववर्षाच्या प्रारंभापासूनच मुंबईची हवा बिघडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत असून, ढगाळ हवामानाने यात आणखी भर घातली आहे. प्रदूषणाचा आलेख वाढतच असून, वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांनी अधिकाधिक काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. दरम्यान, अवेळी दाखल झालेल्या पावसानेदेखील कहर केला असून, गेल्या तीन दिवसांपासून रात्री कोसळत असलेला पाऊस हवामानात वाईटरीत्या बदल घेऊन आला आहे.

दिल्ली, पुणे, अहमदाबाद येथील हवेपेक्षा मुंबईची हवा वाईट नोंदविण्यात येत आहे. देशात दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांत सातत्याने हवेची गुणवत्ता ढासळत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर मुंबईची हवा दिल्लीपेक्षा अत्यंत वाईट नोंदविण्यात येत आहे. कर्नाटक किनाऱ्यापासून महाराष्ट्राच्या किनाऱ्यापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मुंबई, ठाण्यासह लगतच्या परिसरात अवकाळी पाऊस कोसळत असून, सलग तीन दिवस मुंबईसह लगतच्या परिसरात ढगाळ वातावरण आहे. 

गुरुवारसह शुक्रवारीदेखील मुंबईत प्रदूषित हवा नोंदविण्यात आली. मुंबईतल्या अंतर्गत परिसरांचा विचार करता माझगाव, वरळी, वांद्रे-कुर्ला संकुल, बोरीवली, मालाडसह नवी मुंबईतदेखील प्रदूषणाची नोंद झाली असून, असे वातावरण आणखी पुढील काही दिवस राहण्याची शक्यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनीदेखील ‘सीने में जलन आँखों में तुफान सा क्यों है; इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है...’ अशा आशयाचे ट्विट करीत शुक्रवारी रात्रीदेखील मुंबईत हवा अत्यंत प्रदूषित असल्याची माहिती दिली.

यामुळे होतेय प्रदूषणात वाढपावसाचे प्रमाण शनिवारी कमी होईल. शनिवारी पावसाचा प्रभाव किंचित राहील. प्रदूषणाबाबत सांगायचे झाल्यास पूर्वेकडून जमिनीहून जे वारे येत आहेत त्यामुळे धूळीचे प्रमाण वाढले आहे. जमिनीवरून वाहणारे आणि वरून येणारे दक्षिण पूर्व वारे यामुळे पाऊस तयार झाला आहे. दक्षिण पूर्वेकडील वाऱ्यामुळे धूळीचे कण येत आहेत आणि जमिनीवर तरंगत आहेत. हिवाळ्यामध्ये मुंबईत अशा प्रकारचे हवामान अनुभवास येते. पाऊस शनिवारपासून कमी होणार असला तरी धूळयुक्त वातावरणाची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईमध्ये हिवाळ्यात अशा प्रकारचे वातावरण अपेक्षित असते. कारण मुंबईत प्रचंड प्रमाणात बांधकामे सुरू आहेत.- कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग

हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांकवायुप्रदूषण : पार्टीक्युलेट मटॅर (पीएम २.५ / अति सूक्ष्म धूळीकण) 

टॅग्स :प्रदूषणमुंबई