मुंबई : नातू पैशांसाठी धमकावतो, माझा सांभाळ करत नाही, अशी तक्रार ७५ वर्षीय आजीने गोरेगाव पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिच्या नातवाविरोधात ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम कलम २४ तसेच बीएनएस कायद्याचे कलम ३५१(२) , ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार स्मिता रजपूत (७६) या गोरेगावच्या सिद्धार्थनगर परिसरात त्यांच्या मुलीसोबत राहतात. त्या पश्चिम रेल्वेमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत. स्मिता यांचा मोठा मुलगा संजय रजपूत (५५) याने २९ मे २०२५ रोजी राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच्या दोन मुलांपैकी आदित्य रजपूत (२७) हा नशेच्या आहारी गेला आहे. त्याच्याच जाचाला कंटाळून मानसिक नैराश्य येऊन संजयने हे पाऊल उचलले, असे दाखल तक्रारीत म्हटले आहे. स्मिता यांच्या पतीने मृत्यूपूर्वी त्यांची संपत्ती सर्व मुलांमध्ये समान वाटप केली होती. मात्र, आदित्य हा स्मिताकडे संपत्तीची मागणी करतो. तसेच रात्री अपरात्री येऊन त्यांच्या दरवाजाला लाथा मारतो, शिवीगाळ करतो, असा आरोप आहे.
आत्याचाही आरोपीकडून छळतक्रारदाराला सांभाळणाऱ्या त्याच्या आत्यालाही तो सतावतो, असेही तक्रारीत नमूद आहे. खर्चासाठी पैसे मिळावे म्हणून स्मिता यांनी त्यांचा एक प्लॉट बिल्डरला विकला होता. त्याचेही पैसे आदित्य त्यांच्याकडून मागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी त्याला पाच लाख रुपये अकाउंटवर पाठवले; मात्र तरीही त्यांचा सांभाळ न करता अधिक पैशासाठी तो त्यांना त्रास देऊन धमकावत असल्याचाही आरोप आहे. त्यानुसार गोरेगाव पोलिस याप्रकरणी तपास करीत आहेत.