Join us  

नातवाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी आजीने गमावले ५४ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 2:08 AM

पतीपाठोपाठ मुलाचे निधन झाले. सूनही वेगळी राहू लागल्याने नातवाची जबाबदारी ८३ वर्षांच्या आजीच्या खांद्यावर आली. नातवाच्या उच्चशिक्षणासाठी तिची धडपड सुरू झाली. याच धडपडीत नातवाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी आजीबार्इंनी ५४ लाख रुपये गमावल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.

ठळक मुद्देवरळीतील सुनीता शर्मा नावाच्या महिलेने आपली फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वरळी पोलिसांनी शर्माविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पतीपाठोपाठ मुलाचे निधन झाले. सूनही वेगळी राहू लागल्याने नातवाची जबाबदारी ८३ वर्षांच्या आजीच्या खांद्यावर आली. नातवाच्या उच्चशिक्षणासाठी तिची धडपड सुरू झाली. याच धडपडीत नातवाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी आजीबार्इंनी ५४ लाख रुपये गमावल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. वरळीतील सुनीता शर्मा नावाच्या महिलेने आपली फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वरळी पोलिसांनी शर्माविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दादर पूर्वेकडील ड्रीम हाउसमध्ये ८३ वर्षांच्या प्रेमलता शिवचरण सिंह राहतात. पती कोलकाता पोलीस दलात अधिकारी पदावर होते. पतीपाठोपाठ २०१४मध्ये मुलाचेही निधन झाले. तर सून दिल्लीत राहण्यास गेली. त्यामुळे नातवाची जबाबदारी आजीच्या खांद्यावर आली. नातू शिवमदेवने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. पुढे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रवेशासाठी त्या प्रयत्न करत होत्या.

दादर येथील मेडिटेशन सेंटरमध्ये २०१४मध्ये त्यांची सुनीतासोबत ओळख झाली. सुनीताने कामोठे येथील एमजीएम महाविद्यालयात ओळख असल्याचे सांगून तेथे प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी सुनीताने ५४ लाख खर्च येणार असल्याचे सांगितले.

मुलाच्या उच्चशिक्षणासाठी आजीबार्इंनी ५४ लाख रुपये जमा केले. वरळीतील सुखदा अपार्टमेंटमध्ये आॅक्टोबर २०१५मध्ये आजीबार्इंनी सुनीताची भेट घेत तिला पैसे दिले. सुनीताने ती तेथेच राहत असल्याचे प्रेमलता यांना सांगितले होते. मात्र पैसे देऊनही प्रवेशाबाबत सुनीता टाळाटाळ करत असल्याचे प्रेमलता यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तिच्याकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. तेव्हा तिने काम लवकरच होईल असे सांगून फक्त ५० हजार रुपये परत दिले. त्यानंतर सुनीताने संपर्क तोडला. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रेमलता यांनी गुरुवारी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

टॅग्स :वैद्यकीयशैक्षणिक