छायाचित्र प्रदर्शनाचे शानदार उदघाटन -आज अखेरचा दिवस
By Admin | Updated: August 20, 2014 00:26 IST2014-08-20T00:05:58+5:302014-08-20T00:26:56+5:30
; ‘लोकमत उमंग’ द्वारे उमटले कोल्हापूरच्या सौंदर्याचे प्रतिबिंब

छायाचित्र प्रदर्शनाचे शानदार उदघाटन -आज अखेरचा दिवस
कोल्हापूर : लोकमत ‘उमंग’ अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्या व निवडक छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज, मंगळवारी ज्येष्ठ कलासमीक्षक श्रीराम खाडिलकर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संध्याकाळपर्यंत कलादालनात नागरिकांची गर्दी होती.
जागतिक छायाचित्रण दिन व ‘लोकमत’ कोल्हापूर आवृत्तीच्या दशकपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून शाहू स्मारक भवनाच्या कलादालनात आयोजित या उदघाटन कार्यक्रमास ज्येष्ठ छायाचित्रकार शेखर वाली, अनिल वेल्हाळ, राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंदन रेदासने, सरव्यवस्थापक श्रीपाल मुद्धा, प्राचार्य अजेय दळवी, विजय टिपुगडे, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, सरव्यवस्थापक मकरंद देशमुख उपस्थित होते.
यावेळी खाडिलकर म्हणाले, कला समाजाभिमुख असावी असे म्हटले जाते. ‘लोकमत’ने छायाचित्र प्रदर्शन आणि वर्धापनदिन पुरवणीच्या माध्यमातून ते प्रत्यक्षात उतरविले आहे. या सर्वच कलाकृतींतून कोल्हापूरच्या चित्र-शिल्प परंपरेचे प्रतिबिंब उमटले आहे. प्रदर्शनातून मिळणारी रक्कम सामाजिक कार्यासाठी देणे, ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे.
प्रास्ताविकात सरव्यवस्थापक मकरंद देशमुख म्हणाले, ‘लोकमत’ने नेहमीच आगळ्यावेगळ्या उपक्रमांतून समाजकार्य करण्याला प्राधान्य दिले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून सामाजिक संस्थेला मदत करण्यात येणार आहे. या प्रदर्शनालाही राज्यव्यापी स्वरूप देण्यात आले आहे. त्या-त्या जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर अशी प्रदर्शने आयोजित करून त्या शहरातील संस्थांसाठी मदत निधी गोळा केला जाईल.
सायंकाळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख व राजमल लखीचंद ज्वेलर्सचे शाखा व्यवस्थापक भूपेंद्र जैन यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण झाले. शेखर वाली, अनिल वेल्हाळ व प्राचार्य अजेय दळवी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. दीपक मनाठकर यांनी सूत्रसंचालन केले.
करा संस्थेला मदत
दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनातील छायाचित्रांच्या विक्रीतून मिळणारा निधी अपंगांना स्वयंनिर्भर बनविण्यासाठी झटणाऱ्या ‘स्वयम्् या संस्थेला देण्यात येणार आहे. सर्वसामान्यांनादेखील छायाचित्रे खरेदी करता यावीत यासाठी त्यांंची किंमतही अत्यल्प ठेवली आहे.
स्पर्धेचा निकाल असा
हौशी गट : प्रथम : करण मोरे द्वितीय : जयसिंग चव्हाण तृतीय : आदित्य मोरे उत्तेजनार्थ : चंद्रकांत नांद्रेकर, पल्लवी नलवडे
व्यावसायिक गट : प्रथम : प्रथमेश निगवेकर द्वितीय : राजा उपळेकर तृतीय : शशिकांत मोरे उत्तेजनार्थ : सुभाष पुरोहित, बाजी निऊंगरे