रेशन दुकानांमध्ये धान्याचा काळाबाजार

By Admin | Updated: May 15, 2015 00:50 IST2015-05-15T00:50:04+5:302015-05-15T00:50:04+5:30

यूपीए सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यातील स्वस्त अन्नधान्य योजनेचे राज्यात तीनतेरा वाजले आहेत.

Grain black market at ration shops | रेशन दुकानांमध्ये धान्याचा काळाबाजार

रेशन दुकानांमध्ये धान्याचा काळाबाजार

मुंबई : यूपीए सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यातील स्वस्त अन्नधान्य योजनेचे राज्यात तीनतेरा वाजले आहेत. गरिबांसाठी २ रुपये किलो दराने गहू आणि ३ रुपये किलो दराने तांदूळ पुरवणाऱ्या या योजनेचा सर्वाधिक फायदा रेशनिंग दुकानदारांनाच होत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाले आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील रेशनिंग पुरवठा करणाऱ्या दुकानांत केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये धान्याच्या काळाबाजाराचे भीषण वास्तव समोर आले.
प्रस्तुत प्रतिनिधीने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये केवळ चिंचपोकळीच्या दुकानदाराने योजनेतील धान्य देण्यास नकार दिला; तर धारावीतील रेशन दुकानदाराने साठ्याअभावी गहू, तांदूळ देण्यास नकार दिला. उर्वरित तीन ठिकाणी मात्र सर्रास काळाबाजार होत असल्याचेच चित्र पाहावयास मिळाले.
भारतीय अन्न महामंडळातून दुकानात धान्यपुरवठा केल्यानंतर काहीच दिवसांत ते संपल्याचे कारण देत दुकानदार शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्यास नकार देतात. मात्र काळ्याबाजारात धान्यपुरवठा करताना हवे तितके धान्य देण्यास दुकानदार तयार होत असल्याचे समोर आले. बहुतेक रेशन दुकानदारांनी किमान १० किलोपासून कमाल ५० किलोपर्यंत गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. फरक फक्त एवढाच की २ व ३ रुपये किलो दराने मिळणाऱ्या गहू आणि तांदळासाठी १० रुपयांची मागणी करण्यात आली. रेशनिंग कार्डवर १६ रुपये दराने मिळणाऱ्या रॉकेलची काळ्याबाजारातील किंमत ५० ते ७० रुपये असल्याचे स्टिंगमधून समोर आले. मुंबईतील विभागानुसार काळ्याबाजाराचा भाव ठरतो. झोपडपट्टी परिसरात स्वस्त अन्नधान्य योजनेतील गहू व तांदूळ १० रुपये किलो दराने मिळतात; तर चाळ आणि दुमजली इमारती असलेल्या परिसरात हेच गहू आणि तांदूळ १५ ते १७ रुपये किलो दराने विकले जातात.

> अरिहंत स्टोअर, लवलेन, माझगाव, वेळ - सायंकाळी ६ वाजता

प्रतिनिधी : मी घोडपदेवहून आलो आहे. आमच्या मंडळाचा १० जूनला साईभंडारा आहे. त्यासाठी ५० किलो गहू आणि ५० किलो तांदळाची गरज आहे.
दुकानदार : एवढे धान्य एकत्र मिळणार नाही. जास्तीत जास्त २० किलो गहू आणि तांदूळ मिळतील.
प्रतिनिधी : चालेल. पण कधीपर्यंत मिळतील?
दुकानदार : दोन दिवसांनंतर या. तेव्हा सांगतो.
प्रतिनिधी : पण किती रुपये भावाने मिळेल? आणि थोडे रॉकेलही हवे होते.
दुकानदार : १० रुपयांचा भाव सुरू आहे. रॉकेल किती हवे आहे?
प्रतिनिधी : जास्त नाही. फक्त ५ लीटर.
दुकानदार : मिळेल.
प्रतिनिधी : किती रुपये लीटर?
दुकानदार : ६५ रुपये लीटर.
प्रतिनिधी : पण दुसरीकडे एवढा दर नाही.
दुकानदार : भाऊ, जसा ग्राहक तसा दर आहे.

Web Title: Grain black market at ration shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.