गोविंदांचे वय, उंचीवरून समिती-सरकारमध्ये संघर्ष
By Admin | Updated: July 13, 2015 01:38 IST2015-07-13T01:38:18+5:302015-07-13T01:38:18+5:30
गोविंदा पथके आणि दहीहंडी समन्वय समिती गोविंदांचे वय, उंची या मुद्द्यांवर अडून राहिले आहे. त्यामुळे सरकार आणि समितीत आता जोरदार संघर्ष होणार

गोविंदांचे वय, उंचीवरून समिती-सरकारमध्ये संघर्ष
मुंबई : गोविंदा पथके आणि दहीहंडी समन्वय समिती गोविंदांचे वय, उंची या मुद्द्यांवर अडून राहिले आहे. त्यामुळे सरकार आणि समितीत आता जोरदार संघर्ष होणार असल्याचे दिसून येत आहे. न्यायालयाच्या कडक आदेशानंतरही उंची आणि वयाबाबत तडजोड करण्यास समिती आणि पथके ठाम नकार देत असल्याचे समितीतील सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले. सोमवारी यासंदर्भात समिती अंतिम अहवाल सरकारला सादर करणार आहे. त्यामुळे हा वाद आता अधिकच तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
गोविंदांची उंची २० फुटांपेक्षा अधिक असू नये. तसेच १८ वर्षांखालील मुलांना या उत्सवात सहभागी करून घेऊ नये, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. असे असूनही हे आदेश मानण्याची मानसिकता अजूनही समितीची झालेली नाही. वयाची अट १२ वर्षांपर्यंत शिथिल करावी, असे समितीचे तसेच गोविंदा मंडळांचे म्हणणे आहे. उंचीची मर्यादादेखील समितीसह गोविंदा मंडळांना अमान्य आहे.
दहीहंडी उत्सवाच्या धोरण निश्चितीवरून यापूर्वी शासकीय समिती आणि गोविंदा पथकांमध्ये खटके उडालेले आहेत. परंतु गेल्या आठवड्यात एकत्र बैठक घेत समिती आणि गोविंदा मंडळांनी अंतिम धोरणासाठी धावाधाव करीत मसुदा बनवला. या मसुद्यात गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा द्यावा, अशीही शिफारस करण्यात आली आहे. धोरणातील अन्य शिफारशी मात्र गुप्त ठेवण्यात आल्या आहेत.
मुंबई आणि ठाण्यात राजकीय पक्षपुरस्कृत मानाच्या हंड्या लागतात. गेल्यावर्षी ऐन दहीहंडीच्या तोंडावर न्यायालयाने निर्बंध घातल्याने या मंडळांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन याला स्थगिती मिळविली
होती. त्यामुळे आता फडणवीस
सरकार याबाबत नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)