गोविंदा आता रस्त्यावर उतरणारच !

By Admin | Updated: August 12, 2015 03:19 IST2015-08-12T03:19:51+5:302015-08-12T03:19:51+5:30

दहीहंडीच्या धोरणाकडे दिले जाणारे दुर्लक्ष, न्यायालयाने उत्सवावर लावलेले निर्बंध, उत्सव मंडपांचा सुरू असलेला वाद, सरावाला होणारा पोलिसांचा अटकाव अशा एक ना अनेक मुद्द्यांच्या विरोधात

Govinda will go on the road now! | गोविंदा आता रस्त्यावर उतरणारच !

गोविंदा आता रस्त्यावर उतरणारच !

मुंबई : दहीहंडीच्या धोरणाकडे दिले जाणारे दुर्लक्ष, न्यायालयाने उत्सवावर लावलेले निर्बंध, उत्सव मंडपांचा सुरू असलेला वाद, सरावाला होणारा पोलिसांचा अटकाव अशा एक ना अनेक मुद्द्यांच्या विरोधात गोविंदांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार केला आहे. स्वातंत्र्यदिनी दुपारी १२ वाजता थेट हुतात्मा चौकात थरांचे मनोरे रचून राज्य शासनाविरोधात निषेध करण्यात येणार आहे.
ठाणे येथील संघर्ष प्रतिष्ठानचे जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली गोविंदा पथके सरकारविरोधात एल्गार पुकारणार आहेत. या विषयीची अंतिम बैठक बुधवारी त्यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांना डावलून उत्सव साजरा करणार का, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. शिवाय रविवारी दहीहंडी समन्वय समितीच्या जाहीर सभेत बालगोविंदांना सहभागी करून न घेण्याचा विचार मांडण्यात आला होता. मात्र आव्हाडांच्या बैठकीनंतर न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवून यंदाचा उत्सव साजरा होणार का, असेच दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला दहीहंडी, गणेशोत्सवांसारख्या उत्सवांसाठी भाजपा, सेना तोडगा काढत असताना या वादात राष्ट्रवादीने उडी मारल्याने श्रेयाचे राजकारण जोरदार पेटण्याची शक्यता आहे.
हुतात्मा चौकात करण्यात येणाऱ्या या शक्तिप्रदर्शनात मोठ्या संख्येने गोविंदांनी सहभागी होण्यासाठी सोशल मीडियावरून आवाहन करण्यात येत आहे. याला दहीहंडी समन्वय समितीनेही पाठिंबा दिला असून, शहर-उपनगरांतील नामांकित गोविंदा पथकेही यात सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)

अंतिम बैठक बुधवारी
ठाणे येथील संघर्ष प्रतिष्ठानचे जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्राच्या वीरांना अभिवादन करून उत्सवाच्या स्वातंत्र्याची लढाई सुरू करा, असा संदेश देत सर्व गोविंदा पथके सरकारविरोधात एल्गार पुकारणार आहेत. सोमवारी ठाण्यात आव्हाड यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या विषयीची अंतिम बैठक बुधवारी त्याच ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.

Web Title: Govinda will go on the road now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.