बक्षिसांच्या ‘दुष्काळा’ने गोविंदा पथके नाराज!

By Admin | Updated: September 7, 2015 02:37 IST2015-09-07T02:37:46+5:302015-09-07T02:37:46+5:30

‘बोल बजरंग बली की जय...’ असा घोष करीत रविवारी शहर-उपनगरात गोविंदा पथके हंडी फोडण्यास उत्साहात निघाली. मात्र बक्षिसांच्या ‘दुष्काळा’ने गोविंदांच्या पदरी निराशाच आली

Govinda squads angry with prizes | बक्षिसांच्या ‘दुष्काळा’ने गोविंदा पथके नाराज!

बक्षिसांच्या ‘दुष्काळा’ने गोविंदा पथके नाराज!

मुंबई : ‘बोल बजरंग बली की जय...’ असा घोष करीत रविवारी शहर-उपनगरात गोविंदा पथके हंडी फोडण्यास उत्साहात निघाली. मात्र बक्षिसांच्या ‘दुष्काळा’ने गोविंदांच्या पदरी निराशाच आली. शिवाय, लाखोंच्या बक्षिसांची लयलूट करणाऱ्या गोविंदा पथकांना काहीशा रुपयांवर समाधान मानावे लागले. तर काही आयोजकांनी फक्त आकर्षक ट्रॉफी देऊन गोविंदा पथकांच्या तोंडाला पाने पुसली. परिणामी, आयोजकांच्या अशा फसव्या वागण्यामुळे गोविंदा पथकांमध्ये दिवसभर तीव्र नाराजी दिसून येत होती.
रविवारी सकाळपासून जागेवाल्याची हंडी फोडत शहर-उपनगरातील गोविंदा पथकांनी हंड्या फोडण्यास सुरुवात केली. शहरातील वरळीच्या सचिन अहिर यांचा उत्सव रद्द झाल्याने जांभोरी मैदानाच्या परिसरात शांतता दिसून आली. ऐन पावसाळ्यात ‘वरुणराजा’ने दांडी मारल्याने गोविंदा पथकांना दिवसभर उन्हाच्या काहिलीने हैराण केले. शिवाय, आयोजनांच्या ठिकाणीही पाण्याचा अपव्यय होऊ नये, याकरिता पाण्याचा वापर टाळलेला दिसून आला. दरवर्षीप्रमाणे केवळ लोकप्रिय आयोजकांकडे ‘थरथराट’ करणाऱ्या पथकांची पावले यंदा गल्लोगल्लीत फिरताना दिसली.

गोविंदा पथकांना कांदेवाटप
दादर फुलमार्केट येथे शिवसेना शाखा क्र.१८४ आयोजित दहीहंडी उत्सवात यशस्वीरित्या थरांची सलामी देणाऱ्या पथकाला कांदेवाटप करण्यात आले. या ठिकाणी पुरुष गोविंदा पथकाला एक किलो तर महिला गोविंदा पथकांना दोन किलो कांदे वाटप करुन आगळावेगळा उत्सव साजरा करण्यात आला.

एक्क्यानेच काढला ‘सेल्फी’
दादर येथे नक्षत्र मॉल येथील मनसे आयोजित दहीहंडी उत्सवात चार थर रचून त्या पथकातील हंडी फोडणाऱ्या एक्क्यानेच चक्क सेल्फी स्टीकने हंडीचा ‘थरथराट’ कॅमेऱ्यात टिपला. या वेळी परिसरात उपस्थित बघ्यांनी या पथकातील ‘एक्क्या’ला शाबासकी देत टाळ्यांचा जल्लोष केला. शिवाय, प्रत्येकानेच हा वेगळा क्षण टिपण्यासाठी मोबाइल आणि कॅमेरे उंचावले.

टी-शर्ट्समधून सामाजिक संदेश!
दहीहंडी उत्सवाच्या वादंगावर भाष्य करण्यासाठी बऱ्याच गोविंदा पथकांनी टी-शर्ट्सवरील संदेशांचा वापर केला. शिवाय, काही पथकांनी सामाजिक विषयावर जनजागृतीपर संदेश देऊन सामाजिक जबाबदारीचेही भान राखले. त्यात उत्सवाची स्पर्धा करू नका, झाडे लावा आणि झाडे जगवा, स्त्रीभ्रूणहत्या टाळा असे विविध सामाजिक संदेश गोविंदा पथकांनी दिले; तर काही गोविंदा पथकांनी पारंपरिक पद्धतीने चित्ररथ काढत विविध सामाजिक विषयांवरील देखावे सादर केले.

माझगावने शान राखली...
नऊ थरांचा विश्वविक्रम रचणाऱ्या माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने रविवारी जवळपास चार ठिकाणी सात थर रचले. तर माझगाव ताडवाडी येथील प्रसिद्ध असणाऱ्या श्री दत्त क्रीडा मंडळानेही दिवसभरात तब्बल १० वेळा यशस्वीरीत्या सात थर रचून सलामी दिली. ताडवाडीच्या अष्टविनायक गोविंदा पथकानेही सहा वेळा ६ थर आणि चार वेळा ७ थर रचले. साधारण दीड महिना मेहनत, जिद्द, चिकाटी आणि अचूक मार्गदर्शनाने केलेल्या सरावाचे अद्भुत सादरीकरण या पथकांनी केले.

आयोजकांवर कारवाई थंड
दहीहंडी उत्सवासाठी ३५ हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाईची हंडी फुटेल, असे वाटत होते. मात्र रात्रीपर्यंत पोलिसांकडून एकही कारवाई झालेली नसल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन होत असतानाही कारवाई मात्र थंडच असल्याचे चित्र दिसून आले. त्यात ८०० बड्या हंड्यांचे पोलिसांकडून व्हीडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले. आता त्याच्या तपासणीतून पोलीस काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Govinda squads angry with prizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.