राज्यपालांच्या निषेधार्थ फाडले निवेदन, राजभवनावर जाणारा मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला, अदानी - अंबानींच्या वस्तुंवर बहिष्काराचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:30 IST2021-02-05T04:30:49+5:302021-02-05T04:30:49+5:30
राजभवनावर जाणारा मोर्चा पाेलिसांनी मेट्रो सिनेमाजवळ अडवला : अदानी-अंबानींच्या वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन मुंबई : संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी राज्यपाल ...

राज्यपालांच्या निषेधार्थ फाडले निवेदन, राजभवनावर जाणारा मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला, अदानी - अंबानींच्या वस्तुंवर बहिष्काराचे आवाहन
राजभवनावर जाणारा मोर्चा पाेलिसांनी मेट्रो सिनेमाजवळ अडवला : अदानी-अंबानींच्या वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन
मुंबई : संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सोमवारी जहरी टीका केली. शेतकऱ्यांना भेटायला न थांबता राज्यपाल गोव्याला गेले. राज्यपालांनी महाराष्ट्रातील श्रमिक जनतेचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांना निवेदन देणार नाही, ते राष्ट्रपतींना पाठवू, असे सांगतानाच निवेदनाच्या प्रती फाडून आंदोलक नेत्यांनी राज्यपालांचा निषेध केला. तसेच अदानी, अंबानी यांची उत्पादने आणि सेवांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
आझाद मैदान येथील जाहीर सभेनंतर आंदोलकांनी राजभवनाच्या दिशेने मोर्चा वळविला. पोलिसांनी मेट्रो सिनेमाजवळ आंदोलकांना अडविले. तिथून संयुक्त शेतकरी मोर्चाचे २३ प्रतिनिधी मागण्यांचे निवेदन देण्यासाठी राजभवनावर जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी पोलीस बंदाेबस्तासह सज्ज हाेते. मात्र, राज्यपाल राजभवनात नाहीत. ते गोव्याला गेले आहेत. त्यामुळे त्यांना निवेदन द्यायचे नाही, असा निर्णय उपस्थित नेत्यांनी तिथेच चर्चेअंती घेतला.
याची घोषणा करताना किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे म्हणाले की, राज्यपालांनी स्वतः भेटीची वेळ दिली होती; पण आंदोलकांना वाटाण्याच्या अक्षता लावून राज्यपाल मजा मारायला गोव्याला निघून गेले. राज्यपाल आधी भाजपचे मुख्यमंत्री होते; त्यामुळे त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा करता येणार नाही. राज्यपालांचे सचिव किंवा एडीसींना आम्ही निवेदन देणार नाही. राज्यपालांचा निषेध करीत या निवेदनाच्या प्रती फाडण्याचा निर्णय झाला आहे.
आज, प्रजासत्ताकदिनी आझाद मैदानात ध्वजवंदन केले जाईल. यावेळी राज्यभर भाजपविरोधात आणि कृषी कायद्यांविरोधात प्रचार केला जाईल. हमीभाव, वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संघर्षाची शपथ घेतली जाईल, असेही ढवळे यावेळी म्हणाले. तसेच, मोदी, शहा आणि अंबानी, अदानी यांच्याविरोधात लढा तीव्र केला जाईल. त्यांच्या सर्व वस्तू आणि सेवांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन ढवळे यांनी केले. याप्रसंगी भाई जगताप, चरणसिंग सप्रा, सचिन सावंत, अजित नवले, जयंत पाटील, विद्या चव्हाण, मेधा पाटकर, आदी उपस्थित होते.
...............................