Join us
Daily Top 2Weekly Top 5

पदकांची लयलूट करणाऱ्या एनसीसी चमूचे राज्यपालांनी केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 04:44 IST

राजधानी नवी दिल्लीतील यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात विविध वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करणा-या एन.सी.सी. चमूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी राजभवनावर बोलावून कौतुक केले.

मुंबई - राजधानी नवी दिल्लीतील यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात विविध वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करणा-या एन.सी.सी. चमूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी राजभवनावर बोलावून कौतुक केले. महाराष्ट्र ही छत्रपती शिवराय व सरखेल कान्होजी आंग्रे यांसारख्या शूरवीरांची भूमी आहे. या भूमीने परकीय सत्तेला सर्वांत मोठे आव्हान दिले होते. आपण सर्व नागरिक एकात्म भावनेने राहिलो तर कोणतीही परकीय सत्ता आपल्याला पराभूत करू शकणार नाही. युवकांनी आयुष्यात नोकरी, व्यवसाय, उद्योग यापैकी कोणताही मार्ग निवडला तरीही देशाप्रति आपले कर्तव्य पार पाडावे आणि बांधिलकी जोपासावी, असे आवाहन राज्यपालांनी एन.सी.सी. कॅडेट्सना या वेळी केले.या वेळी एनसीसी चमूने महाराष्ट्राचे विविधांगी दर्शन घडविणारा सांगीतिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाला एनसीसीचे तसेच संरक्षण दलाचे अधिकारी उपस्थित होते. यंदा प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये महाराष्ट्र एनसीसीच्या ७४ मुले व ३७ मुलींच्या चमूने भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या रिशान संजय हेमाडी याने बेस्ट कॅडेट (आर्मी) हा किताब पटकावला तर कार्तिकेय गौतम याने बेस्ट कॅडेट (एअर) हा किताब प्राप्त केला. जुनियर अंडर आॅफिसर आसावरी तानवडे हिला द्वितीय तर ईशा देव शर्मा हिला बेस्ट कॅडेट म्हणून तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. कॅडेट सागर मुगले याला २६ जानेवारी रोजी राजपथ येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये मुलांच्या तुकडीचे नेतृत्व करण्याचा मान मिळाला. राज्यातील ५ मुले व २ मुलींना मान्यवरांना ‘सन्मान गार्ड’ देण्याचा बहुमान मिळाला.महाराष्ट्र एनसीसीने यंदा सर्वोत्तम संचालनालय अखिल भारतीय स्थल सैनिक शिबिर (मुली), नकाशा वाचन स्पर्धा (मुली), हेल्थ व हायजिन (मुले), नेमबाजी (मुले), शिप मॉडेलिंग (मुले) या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. याशिवाय, सहा कॅडेट्सनी सुवर्ण तर १६ कॅडेट्सनी रौप्यपदक पटकाविले. 

टॅग्स :मुंबई