राज्यात निर्बंध उठवण्यासाठी सरकारचा वाटाघाटीचा नवा धंदा - आशिष शेलार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:13 IST2021-09-02T04:13:53+5:302021-09-02T04:13:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात ठाकरे सरकारने निर्बंधांचा नवीन धंदा सुरू केला आहे. वाटा मिळाला की, निर्बंध शिथिल ...

राज्यात निर्बंध उठवण्यासाठी सरकारचा वाटाघाटीचा नवा धंदा - आशिष शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात ठाकरे सरकारने निर्बंधांचा नवीन धंदा सुरू केला आहे. वाटा मिळाला की, निर्बंध शिथिल होतात, जिथे घाटा आहे तिथे निर्बंध कडक राहतात. रेस्टॉरंटवाले, बारवाले भेटले की, वाटाघाटी केल्या जातात, तर दुसरीकडे मराठी कलावंतांपासून धूप-कापूर विकणारे हे घाट्यात आहेत. ते वाटाघाटी करू शकत नाहीत, वाटा देऊ शकत नाहीत, म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत, असा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
वांद्रे येथे पत्रकारांशी बोलताना शेलार म्हणाले, मंगळवारी दिवसभर गोविंदांवर नोटीस, धरपकड, अटक अशा कारवाया करण्यात आल्या. बळाचा वापर करत सुलतानी पद्धतीचा कारभार महाराष्ट्रात दिसला. करोडोंची वसुली करणाऱ्या सचिन वाझेचा प्रश्न आम्ही विधिमंडळात उपस्थित केला. तेव्हा ‘सचिन वाझे लादेन आहे काय?’ अशी विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. गोविंदांवर कारवाई करणाऱ्या सरकारने आता हे गोविंदा काय लादेन आहेत काय, याचे उत्तर द्यावे. दोन वर्षांत महाराष्ट्र बंदीवान केल्याचा विक्रम ठाकरे यांच्या नावावर लिहिला जाईल, असे दुर्दैवी चित्र असल्याचे शेलार म्हणाले. आता गणेशोत्सव, नवरात्र मंडळांसोबतही शिवसेना वाटाघाटी करणार का, असा प्रश्नही त्यांनी या वेळी केला.
“आमचा सणांना विरोध नाही, कोरोनाला विरोध आहे. गर्दी जमू नये,” असे मुख्यमंत्री म्हणाले. मग, राज्यात रेस्टॉरंट, बार, पब येथे जमणाऱ्या गर्दीचे काय, असा प्रश्नही शेलार यांनी केला. केंद्राचे पत्र दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने सिलेक्टिव्ह राजकारण करू नये. २०१९ पर्यंत ‘पहिले मंदिर, बाद में सरकार’ अशी शिवसेनेची घोषणा होती. आता ‘पहिले मदिरालय, बाद मे मंदिर’ असे यांचे धोरण बदलले आहे, असा टोला शेलार यांनी लगावला. नियम, नियमावली करून मंदिरे उघडा, नियम करून गणेशोत्सव साजरा करू द्या. हिंदू सणांवर आक्रमण बंद करा, अशी मागणीही शेलार यांनी केली.
राऊत यांना अंतर्गत धोका असावा
संजय राऊत यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे, चांगले आहे. ते नेहमी पुढे बोलताना दिसतात, त्यामुळे पक्ष कोण चालवतो हेही दिसतेय. बहुतेक त्यामुळेच त्यांना बाहेरून नाही, तर अंतर्गत धोका असल्याने सुरक्षा वाढवली असावी, असेही शेलार यांनी यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना म्हटले.
थिएटरसाठी खासदाराच्या जावयाच्या वाटाघाटी
राज्यातील थिएटर सुरू करण्यासाठी शिवसेनेच्या एका राज्यसभा खासदाराचा जावई सरकारच्या वतीने वाटाघाटी करतो आहे. वाटाघाटी करा, मग निर्बंध शिथिल करू, असा धंदा सुरू आहे. जावयाने हे धंदे बंद करावेत; अन्यथा रेकाॅर्डिंगसह नाव जाहीर करू, असा इशारा शेलार यांनी दिला. मात्र, त्या जावयाचे नाव सांगायचे टाळले.