Join us

“वाहतूकदारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक, उपोषण-संप करू नये”; प्रताप सरनाईकांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 20:35 IST

Pratap Sarnaik News: वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्या संयुक्त समितीचा अहवाल एका महिन्यात प्राप्त होणार आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

Pratap Sarnaik News: वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी  प्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्या संयुक्त समितीचा अहवाल एका महिन्यात  प्राप्त होणार आहे. स्कूल बस वाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे. इतर विविध वाहतूक संघटनांना स्वतंत्रपणे चर्चेसाठी वेळ देता येईल.  उपोषण व संप करू नये, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. विधानमंडळ समिती कक्षामध्ये परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार,  उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, वाहतूकदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये टँकर वाहतूकदार व इतर वाहतूकदारांचे प्रतिनिधी घेण्यात येतील. व्यापार वाढल्याने विकासास फायदा राज्य शासनाला होतो . व्यापार वाढण्यामध्ये वाहतूकदारांचा मोलाचा वाटा असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वाहतूकदारांच्या बाजूने निर्णय घेण्यात येईल असे सांगितले आहे.   वाहतूकदारांचा विकासात सहभाग महत्त्वाचा असल्याने त्यांना संरक्षण देणे हे शासनाचे काम आहे, असे त्यांनी सांगितले.

पोलीस आणि परिवहन विभाग यांना सूचना

परिवहन मंत्र्यांनी शहरांमध्ये पार्किंग जागा निर्माण करणे, विशेषतः मुंबई शहरातील खाजगी प्रवासी बसेस, स्कूल  व्हॅन, माल ट्रक,  टँकर आधी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था होईल. परिवहन विभागाचे चेक नाके बंद करण्यात आले आहेत. तसेच कोणतीही चुकीची कारवाई केली जाऊ नये या दृष्टीने पोलीस आणि परिवहन विभाग यांना अशा सूचना यावेळी दिल्या आहेत. 

दरम्यान, राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, मुंबई शहरात खाजगी प्रवासी बस व स्कूल बस यांच्या पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी काम केले जात आहे. बेस्ट बसेसच्या पार्किंगच्या जागा, हजारोंच्या संख्येने असलेल्या बसेससाठी जागा उपलब्ध करणे गरजेचे आहे. नगर विकास पोलीस व परिवहन विभागाच्या वतीने एकत्रित बैठक घेण्यात येईल. इ-चलानबाबत तक्रारीची दखल घेऊन पोलीस विभागास सूचना दिली. मुख्य सचिव चव्हाण व परिवहन आयुक्त भिमनवार यांनी माहिती सादर केली. वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी संप मागे घेण्याबाबतच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. 

 

टॅग्स :प्रताप सरनाईकराज्य सरकार