‘हे’ सरकार चर्चा न करताच निर्णय घेत आहे, डॉ. राधा कुमार यांची मोदी सरकारवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 02:09 IST2017-09-10T02:09:52+5:302017-09-10T02:09:57+5:30
बांगलादेश निर्मितीवेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मोठी चर्चा घडवून आणली, हजारो लोकांनी त्यावर आपली मते नोंदवली आणि चर्चेतून तो प्रश्न त्यांनी सोडवला.

‘हे’ सरकार चर्चा न करताच निर्णय घेत आहे, डॉ. राधा कुमार यांची मोदी सरकारवर टीका
मुंबई : बांगलादेश निर्मितीवेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मोठी चर्चा घडवून आणली, हजारो लोकांनी त्यावर आपली मते नोंदवली आणि चर्चेतून तो प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र आता काय चालू आहे हे मी सांगायला हवे का? असे म्हणत प्रख्यात लेखिका डॉ. राधा कुमार यांनी नरेंद्र मोदी सरकार कोणतीही चर्चा न करता नोटाबंदीपासून ते सर्जिकल स्ट्राइकपर्यंतचे विषय कसे हाताळत आहे, याकडे अंगुलीनिर्देश केला.
इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभरात मान्यवरांची व्याख्याने होत आहेत. त्याचाच भाग म्हणून शनिवारी मुंबईत प्रदेश काँग्रेस समिती व मुंबई काँग्रेसच्या वतीने परिसंवाद झाला.
प्रख्यात लेखिका व जम्मू-काश्मीरच्या माजी समन्वयक डॉ. राधा कुमार यांनी ‘इंदिरा, काल, भारत आज : परराष्टÑ धोरणापुढील आव्हाने’ या विषयावर मते मांडली. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, उपसभापती माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी अध्यक्ष गुरुदास कामत, माजी मंत्री सुरेश शेट्टी उपस्थित होते.
डॉ. राधा कुमार म्हणाल्या, सध्याचे सरकार पाकिस्तानचा विषय अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळत आहे. परराष्ट्र धोरण तयार करताना आपण जम्मू-काश्मीरच्या समस्या गांभीर्याने हाताळत नाहीत.
भारताने पॅलेस्टाईनपेक्षा इस्रायलकडे जास्त झुकणे हे योग्य वाटते का? याची कारणे आणि परिणामांविषयी आपले मत काय, असा प्रश्न राज्यसभेचे माजी सदस्य भालचंद्र मुणगेकर यांनी विचारला. त्यावर मी जास्त काही बोलू इच्छित नाही. पण मी एवढे नक्की म्हणेन की आम्ही जास्तीतजास्त जातीयवादी होत चाललो आहोत, असे त्या
म्हणाल्या.
इंदिराजी पंतप्रधान झाल्या तेव्हा अनेकांनी त्यांच्या क्षमतेबद्दल शंका घेतली, त्यांचा उपाहास केला. परंतु, येथील पुरुषप्रधान व्यवस्थेत त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. स्वातंत्र्यानंतर जेमतेम २० वर्षांनी त्या पंतप्रधान झाल्या. देश नुकताच युद्धाला सामोरा गेला होता. अन्नधान्याची कमतरता होती, अर्थव्यवस्था कमकुमत होती. दोन्ही बाजूला शत्रू राष्ट्रे होती. महाशक्तींशी संबंध कसे असावेत, हे इंदिराजींनी दाखवून दिले, असेही त्यांनी स्पष्ट केले.