मुंबई : गणेश मंडपांसाठी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रति खड्डा आकारला जाणारा १५ हजारांचा दंड कमी करून २ हजार रुपये करण्यात आला असून, ती रक्कमही माफ करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्याचबरोबर लालबागचा राजा मंडपाबाहेरील अग्निशमन बंबासाठी महापालिका आकारत असलेले दिवसाला सव्वालाख रुपये शुल्क कमी करण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली, अशी माहिती सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे मुंबई अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना दहिबावकर म्हणाले, विसर्जन मिरवणुकीचे नियोजन, पोलिस विभागाशी समन्वय, प्लास्टर ऑफ पॅरिसबाबत मर्यादित निर्बंध, तसेच काकोडकर समितीचा अहवाल लवकर प्रसिद्ध करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
गेल्या ३० वर्षापासून मिळणारी गणेश विसर्जन दिवशीची सुट्टी यंदा रद्द झाल्याने, खासगी संस्थांनाही विचारात घेऊन ती पुन्हा जाहीर करावी, अशी मागणी गणेश मंडळांनी केली आहे.