सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नाही

By Admin | Updated: April 14, 2015 22:44 IST2015-04-14T22:44:49+5:302015-04-14T22:44:49+5:30

राज्यातील विद्यमान भाजपा-सेना सरकारने प्रशासनावरील अपेक्षित नियंत्रण गमावले आहे.

The government has no control over the administration | सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नाही

सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नाही

अलिबाग : राज्यातील विद्यमान भाजपा-सेना सरकारने प्रशासनावरील अपेक्षित नियंत्रण गमावले आहे. त्यामुळे राज्यातील जनसामान्यांना अनेक समस्या आणि प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार सुनील तटकरे यांनी केली आहे.
रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पेझारी येथे आयोजित पत्रकार वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबरच रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, उपाध्यक्ष प्रकाश धुमाळ, ज्येष्ठ नेते विजय कवळे, संतोष निगडे व अ‍ॅड. सुशील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
देशात व राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर राज्यात प्रबळ विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली. गोविंद पानसरे हत्या तपासातील अपयश, नागपूरसह संपूर्ण राज्यात महिला, बालके आणि व्यावसायिक यांच्यावरील वाढलेले हल्ले व अत्याचार, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेले खरीप व रब्बी पिकांचे नुकसान व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात सरकारला आलेले अपयश या जनसामान्यांच्या महत्त्वाच्या मुद्यांवर तोडगा काढण्यात विद्यमान सरकारला अपयश आल्याचे तटकरे यांनी सांगितले. आघाडीच्या काळात आणलेल्या अन्नसुरक्षा विधेयकामुळे एक कोटी कार्डधारकांना धान्य उपलब्ध झाले. त्यासाठी १२० कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली होती. आता हे अनुदान बंद केल्याने एक कोटी लाभधारक या योजनेस वंचित राहिल्याचे तटकरे यांनी सांगितले.
तिजोरीत आघाडी सरकारने खडखडाट केला असल्याचा भाजपा-सेना सरकारचा दावा खोटा असून गेल्या दहा वर्षांत सरकारचे उत्पन्न वाढल्याचे स्पष्ट झाले. कर्जबोजा वाढला तरी तो नियोजन आयोग आणि रिझर्व्ह बँक यांच्या नियंत्रण धोरणाप्रमाणे असल्याचेही दिसून आले. सत्तेसाठी व्याकूळ झालेल्या शिवसेनेला सत्तेत राहून वेगळी भूमिका घेता आलेली नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली. (विशेष प्रतिनिधी)

कृतज्ञता वर्ष संकल्प : २०१५-१६ हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वयाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. ते कृतज्ञता वर्ष म्हणून पाळण्याचा संकल्प पक्षाने केला असून त्याचा प्रारंभ गेल्या ८ मार्च रोजी जागतिक महिलादिनी झाला, तर त्याचा समारोप ९ मार्च २०१६ रोजी होणार आहे. राज्याच्या प्रत्येक तालुक्यांत प्रत्यक्ष पोहोचून थेट जनसंपर्क असलेले ते एकमेव नेते असल्याचे त्यांनी सांगितले.

कृतज्ञता वर्ष संकल्प : २०१५-१६ हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वयाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. ते कृतज्ञता वर्ष म्हणून पाळण्याचा संकल्प पक्षाने केला असून त्याचा प्रारंभ गेल्या ८ मार्च रोजी जागतिक महिलादिनी झाला, तर त्याचा समारोप ९ मार्च २०१६ रोजी होणार आहे. राज्याच्या प्रत्येक तालुक्यांत प्रत्यक्ष पोहोचून थेट जनसंपर्क असलेले ते एकमेव नेते असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The government has no control over the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.