सरकारी गोंधळाचीही ‘शंभरी’!
By Admin | Updated: February 7, 2015 02:07 IST2015-02-07T02:07:27+5:302015-02-07T02:07:27+5:30
१०० दिवसात कोणकोणते महत्वाचे निर्णय घेतले, एकत्रित करून ते प्रसारमाध्यमांना कोणी द्यायचे, यावरून मुख्यमंत्री कार्यालय आणि माहिती व जनसंपर्क विभागातच टोलवाटोलवी चालू होती.

सरकारी गोंधळाचीही ‘शंभरी’!
मुंबई :सरकारने १०० दिवसात कोणकोणते महत्वाचे निर्णय घेतले, एकत्रित करून ते प्रसारमाध्यमांना कोणी द्यायचे, यावरून मुख्यमंत्री कार्यालय आणि माहिती व जनसंपर्क विभागातच टोलवाटोलवी चालू होती. अनेक मंत्र्यांनी आमचे निर्णय मुख्यमंत्री कार्यालयातून दिले जातील असे सांगून हात वरती केल्याने १०० दिवस पूर्ण होण्याच्या पूर्वसंध्येला सरकार पातळीवर एकुणच गोंधळाची स्थिती होती.
अन्न व पुरवठा मंत्री गिरीष बापट म्हणाले, सगळ्या निर्णयांचे एकत्रीकरण करण्याचे काम मुख्यमंत्री कार्यालय करत आहे. त्यांच्याकडूनच निर्णय मिळतील. मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी हेमराज बागूल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले ‘कम्पायलेशन’चे काम माहिती खात्यातर्फे केले जात आहे. तेच माहिती देऊ शकतील. माझ्याकडे काहीच नाही.
मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रविकिरण देशमुख म्हणाले, सगळ्या मंत्र्यांकडून निर्णय मागवलेले आहेत. त्याचे एकत्रिकरण सुरु आहे पण अद्याप माझ्यापर्यंत कॉपी आलेली नाही. याबाबत मुख्यंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, माहिती खात्याच्या सचिव मनिषा म्हैसकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचेही मोबाईल बंद येत होते. त्यामुळे सराकरने नेमके कोणते निर्णय घेतले आहेत व घेतलेल्या निर्णयाचे काय झाले आहे याची कोणतीही माहिती ६ फेब्रुवारीच्या सायंकाळपर्यंत उपलब्ध झालेली नव्हती.