सरकारी अनास्थेचा कळस!
By Admin | Updated: February 22, 2015 02:05 IST2015-02-22T02:05:33+5:302015-02-22T02:05:33+5:30
प्राणघातक हल्ल्यानंतर कॉ. गोविंद पानसरे यांनी पाच दिवस मृत्यूशी झुंज दिली. या चार दिवसांत पोलीस यंत्रणेस मारेकऱ्यांना पकडणे शक्य झाले नाही.

सरकारी अनास्थेचा कळस!
मुंबई : प्राणघातक हल्ल्यानंतर कॉ. गोविंद पानसरे यांनी पाच दिवस मृत्यूशी झुंज दिली. या चार दिवसांत पोलीस यंत्रणेस मारेकऱ्यांना पकडणे शक्य झाले नाही. त्यांचा शोध सुरूच आहे. मात्र कॉ. पानसरे यांच्या मृत्यूनंतरही राज्य सरकारची त्याबाबतची उदासीनात दिसून आली. शवविच्छेदनानंतर शनिवारी सकाळी पार्थिव जे. जे. रुग्णालयातून कोल्हापूरला नेण्यासाठी मुंबई विमानतळावर आणण्यात आले. या ठिकाणी शासनाचा प्रतिनिधी हजर असण्याची अपेक्षा असताना एकही मंत्री, अधिकारी फिरकला नाही. तसेच पार्थिव ‘एअर अॅब्युलन्स’द्वारे नेण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता तत्परतेने करावी, यासाठी शासन स्तरावरून विमानतळ प्रशासनाला सूचना देण्याची तसदी घेतलेली नव्हती़ त्यामुळे त्या बाबत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये विलंब लागल्याने पार्थिव तब्बल दोन तास विमानतळावर खोळंबून राहिले. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने, लोकभारती पक्षाचे आमदार कपिल पाटील आदींनी त्याबाबत पुढाकार घेऊन सोपस्कार पूर्ण केले. त्यानंतर पार्थिव कोल्हापूरला रवाना झाले.
ब्रीच कॅन्डी रुग्णालयात शुक्रवारी मध्यरात्री कॉ़ गोविंद पानसरे यांची प्राणज्योत मालवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या स्वकीयांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. मुख्यमंत्र्यांसह खासदार सुप्रिया सुळे, खासदार रामदास आठवले, कामगार नेते विश्वास उटगी यांच्यासह काही डाव्या नेत्यांनी पानसरे यांच्या पार्थिवाचे काल मध्यरात्रीच अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर पानसरे यांचे पार्थिव जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर सकाळी अर्धा तास पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शदर पवार यांनी पानसरे यांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी डाव्या चळवळीतील अनेक जेष्ठ कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यांनी ‘अमर रहे अमर रहे, गोविंद पानसरे अमर रहे, अशा घोषणा लाल निशाणासह दिल्या. अनेकांना अश्रू आवरता आवरणे शक्य झाले नाही.
याबाबत आमदार कपिल पाटील म्हणाले, की विमानतळावर कार्यकर्त्यांची धावपळ पाहून एका पोलीस अधिकाऱ्याने नेमकी परिस्थिती जाणून घेतली. पार्थिव ज्येष्ठ कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे आहे आणि ते कोल्हापूरला नेण्यात येत असल्याचे समजल्यानंतर त्यांनी तातडीने तत्परता दाखवित सर्व बाबींची पूर्तता करण्यास साहाय्य केले. वास्तविक या ठिकाणी शासनाचा प्रतिनिधी हजर असणे आवश्यक होते़ (प्रतिनिधी)
राजधर्माचा विसर ?
पानसरे यांनी आयुष्यभर प्रतिगामी, धर्मांध व सनातनी प्रवृत्तीच्या विरोधात लढा दिला़ सध्या केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारांविरुद्ध त्यांचे वैचारिक मतभेद होते. त्यामुळेच विमानतळावर शासनाचा एकही प्रतिनिधी जाणीवपूर्वक उपस्थित राहिला नसावा, अशी खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.