गोवंडीत महिलेवर बलात्कार; आरोपी अटकेत
By Admin | Updated: December 28, 2014 00:43 IST2014-12-28T00:43:57+5:302014-12-28T00:43:57+5:30
मदत करण्याचे आमिष दाखवत विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटना गोवंडीच्या शिवाजी नगर येथे घडली आहे

गोवंडीत महिलेवर बलात्कार; आरोपी अटकेत
मुंबई : मदत करण्याचे आमिष दाखवत विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटना गोवंडीच्या शिवाजी नगर येथे घडली आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी समाजसेवकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवंडीच्या रफिक नगर येथे राहणाऱ्या या २३ वर्षीय पीडित महिलेचा दोन वर्षांपूर्वी धारावीत राहणाऱ्या एका तरुणासोबत विवाह झाला. मात्र विवाहानंतर पती तिचा शारीरिक छळ करू लागला़ या जाचाला कंटाळून ती पुन्हा माहेरी परतली़ या त्रासातून मार्ग काढण्यासाठी पीडितेचे आई-वडील एका समाजसेवकाला भेटले़ त्या समाजसेवकाने महिलेसोबत पोलीस ठाणे गाठून तिच्या पतीविरोधात हुंडाबळीची तक्रार दाखल केली़ त्यानुसार पोलिसांनी पीडितेच्या पतीलाही अटक केली़
मात्र काही दिवसांनंतर आरोपी समाजसेवक काही ना काही बहाणा करून पीडित महिलेला भेटायला बोलवायचा़ यातून या दोघांमध्ये मैत्री झाली़ त्यानंतर एका हॉटेलमध्ये नेऊन त्याने पीडितेवर बलात्कार केला व याबाबत कोणाला काही सांगू नकोस, असेही त्याने तिला धमकावले़ त्यापाठोपाठ अनेकदा त्याने त्या महिलेवर बलात्कार केला़ शुक्रवारी अशाच प्रकारे तो दारूच्या नशेत महिलेच्या घरात घुसला व तिच्यावर जबरदस्ती करू
लागला़ अखेर महिलेने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले़ (प्रतिनिधी)