गोवंडी पोलीस ठाण्यात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: September 20, 2014 02:36 IST2014-09-20T02:36:53+5:302014-09-20T02:36:53+5:30
जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीने पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गोवंडी पोलीस ठाण्यात घडली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला

गोवंडी पोलीस ठाण्यात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई : जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीने पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गोवंडी पोलीस ठाण्यात घडली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अबझल मस्ते (28) असे या आरोपीचे नाव असून, तो नवी मुंबई येथील राहणारा आहे. गेल्या काही दिवसांपासून या आरोपीने गोवंडी परिसरात अनेकांना चाकूच्या धाकाने लुटले होते. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला अटक केली. गेल्या दोन दिवसांपासून तो पोलीस कोठडीत असतानाच गुरुवारी रात्री या आरोपीने कोठडीतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने कोठडीतील भिंतीवर डोके आपटत स्वत:ला गंभीर जखमी केले. त्यानंतर पोलीस ठाण्यातील पहिल्या मजल्यावरून त्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ या आरोपीला रोखले. मात्र भिंतीवर डोके आपटल्याने तो यामध्ये जखमी झाला होता. पोलिसांनी तत्काळ त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल केले असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)