Join us  

गोरेगावचा विस्तारित वीर सावरकर उड्डाणपूल आजपासून वाहतुकीस खुला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 10:30 AM

गोरेगावचा विस्तारित वीर सावरकर उड्डाणपूल शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून वाहतुकीस खुला झाला आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - गोरेगावचा विस्तारित वीर सावरकर उड्डाणपूल शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून वाहतुकीस अखेर खुला झाला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या दुःखद निधनामुळे कोणताही समारंभ केला नाही. गोरेगावकरांची गैरसोय होऊ नये म्हणून पी दक्षिण विभागातील प्रभागसमिती अध्यक्ष संदीप दिलीप पटेल आणि भाजपा नगरसेविका राजुल देसाई, नगरसेविका श्रीकला पिल्ले, मुंबईभाजपा सचिव समीर देसाई, विश्वहिंदू परिषदेचे कोकणप्रांत अध्यक्ष देवकीनंदन सिंघल यांच्या उपस्थितीत हा उड्डाण पूल गोरेगावकरांसाठी खुला करण्यात आला. संदीप पटेल यांनी लोकमतला ही माहिती दिली.

शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रयत्नाने गोरेगाव पूर्व व पश्चिमेला लिंक रोडपर्यंत जोडणारा विस्तारित वीर सावरकर उड्डाणपूल  पूर्णत्वास आला आहे. या पुलाचे उद्घाटन शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व मुंबईचे महापौर प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, आमदार,माजी महापौर सुनील प्रभू यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी 11 वाजता होणार होते. मात्र देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी संध्याकाळी दुःखद निधन झाल्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

गोरेगावकरांची यामुळे गैरसोय होऊ नये यासाठी सदर पूल हा 17 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय शिवसेना पक्षाकडून घेण्यात आला होता. याची नागरिकांनी नोंद घ्यावी अशी माहिती पालिकेच्या स्थापत्य समिती अध्यक्ष(उपनगरे)साधना माने यांनी लोकमतशी बोलताना दिली होती. या पुलाच्या कामाचा शुभारंभ 26 जानेवारी 2015 साली झाला होता. या पुलासाठी सुमारे 26 कोटी खर्च झाला असून 458 मीटर लांब आणि 11.50 मीटर रुंद असलेल्या या विस्तारित पुलामुळे गोरेगावच्या अनेक वर्षे होणाऱ्या वाहतूक कोंडीस आता ब्रेक लागणार आहे. या पुलाच्या श्रेयवादावरून शिवसेना व भाजपात रंगलेला कलगीतुरा गेले 8 दिवस लोकमत ऑनलाईन व लोकमत वृत्तपत्रातून सातत्याने हा विषय मांडला होता याची जोरदार चर्चा गोरेगावकरांमध्ये होती.

टॅग्स :शिवसेनामुंबईभाजपा