गोराईत साकारले ‘गड-किल्ले’
By Admin | Updated: November 25, 2015 02:12 IST2015-11-25T02:12:10+5:302015-11-25T02:12:10+5:30
दिवाळीमध्ये किल्ला तयार करण्याची परंपरा खूप जुनी आहे. मात्र सध्याच्या इंटरनेटच्या युगामध्ये ही परंपरा कुठे तरी हरवली आहे.

गोराईत साकारले ‘गड-किल्ले’
मुंबई : दिवाळीमध्ये किल्ला तयार करण्याची परंपरा खूप जुनी आहे. मात्र सध्याच्या इंटरनेटच्या युगामध्ये ही परंपरा कुठे तरी हरवली आहे. यासाठीच मोबाइल आणि कॉम्प्युटर गेम्समध्ये रमणाऱ्या आताच्या नव्या पिढीला किल्ले तयार करण्याची परंपरा आणि मराठ्यांच्या इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी गोराईतील उत्साही तरुण मंडळींनी नुकतीच ‘फेरी गडकिल्ल्यांची’ अशी स्पर्धा घेतली. उत्कृष्ट मांडणी आणि माहिती या जोरावर किल्ले रायगडने या स्पर्धेत बाजी मारली.
गेल्या सहा वर्षांपासून बोरीवली येथील गोराई परिसरात ‘आम्ही मावळे’ व ‘स्वयम् युवा प्रतिष्ठान’ यांच्या वतीने विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा प्रथमच या तरुणांनी किल्ले साकारण्याची स्पर्धा घेतली. विशेष म्हणजे गोराईकरांनीसुद्धा या उपक्रमाचे उत्साहात स्वागत करताना आपआपल्या सोसायटीमध्ये किल्ल्यांची प्रतिकृती साकारली.
एकूण ९ रहिवासी सोसायट्यांचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेत शिवनेरी, साईनाथ, चकोर, अनमोल व अष्टविनायक, गंगोत्री, इंद्रप्रस्थ, संकल्प, श्रमसाफल्य आणि आनंद सागर या सोसायट्यांनी राजगड, शिवनेरी, मुरूड-जंजिरा, सिंहगड आणि प्रतापगड अशा प्रतिकृती साकारल्या.
मुळात ही स्पर्धा शालेय मुलांना महाराष्ट्राची संस्कृती व इतिहास कळावा या उद्देशाने घेण्यात आली असल्याने या वेळी स्पर्धकांना साकारलेल्या किल्ल्याची माहिती व इतिहास थोडक्यात सांगण्याची अट ठेवण्यात आली होती. त्यामुळे यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेल्या किल्ल्याची माहिती गोळा करून त्याची योग्य पद्धतीने मांडणी केली.
या स्पर्धेला परीक्षक म्हणून महाराष्ट्रातील किल्ल्यांचा अभ्यास करणारे गौरव भंदिगै यांनी
मांडणी, सजावट, माहिती आणि प्रश्नोत्तरे यानुसार परीक्षण केले. शिवनेरी सोसायटीने साकारलेल्या ‘किल्ले रायगड’ने प्रथम
क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. (प्रतिनिधी)