Join us  

गुगलच्या भाषांतरामुळे विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ, अंतिम परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील भाषांतरावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 9:41 AM

राज्यातील विद्यापीठांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅनलाइन बहुपर्यायी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रत्येक अभ्यासक्रम आणि त्यातील विषयांचे प्रश्नसंच विद्यार्थ्यांना देण्याचे ठरले.

मुंबई : आयडॉल विभागाने अंतिम वर्षाच्या आॅनलाइन बहुपर्यायी परीक्षांसाठी दिलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेत केलेल्या गुगल भाषांतरामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. त्यामुळे अंतिम परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील भाषांतरावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राज्यातील विद्यापीठांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅनलाइन बहुपर्यायी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रत्येक अभ्यासक्रम आणि त्यातील विषयांचे प्रश्नसंच विद्यार्थ्यांना देण्याचे ठरले. मुंबई विद्यापीठाच्या विविध विभागांच्या आणि संलग्नित महाविद्यालयांच्या परीक्षा पार पडल्या असल्या तरी अद्याप आयडॉलच्या परीक्षा बाकी असून एमए (एज्युकेशन) - २ ही त्यातीलच एक परीक्षा आहे.

नमुना प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजी भाषेतून उपलब्ध करून देण्यात आल्या. त्या सोडविताना गुगल ट्रान्सलेटरद्वारे केलेल्या शब्दश: भाषांतरामुळे विद्यार्थी गोंधळले. अनेकांनी मराठी वाचण्याऐवजी इंग्रजी वाचूनच उत्तरे दिल्याचे सांगितले.

नमुना प्रश्नपत्रिकेत ओपन लर्निंग सिस्टमला मराठीत ‘उघडा शिक्षण प्रणाली’ म्हटल्याने विद्यार्थी गोंधळले. विद्यार्थ्यांसमोर असे भाषांतर येण्याआधी विद्यापीठ विभाग, आयडॉल यंत्रणेकडून त्याची तपासणी कशी होत नाही, असा सवालही भाषा तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञांनी उपस्थित केला. अशाच प्रकारचा गोंधळ अंतिम परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत असला तर परीक्षा द्यायची की भाषांतर करीत बसायचे, असा प्रश्न पडल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.

अंतिम परीक्षेवेळी आधी प्रश्नपत्रिकांची होणार तपासणीया नमुना प्रश्नपत्रिका असल्यामुळे प्राध्यापकांचे कदाचित दुर्लक्ष झाले असेल, मात्र अंतिम परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची तपासणी पुन्हा होऊन मगच त्या विद्यार्थ्यांपुढे आणल्या जातात, अशी प्रतिक्रिया विद्यापीठ अधिकाऱ्यांनी दिली. यासंदर्भात अधिक माहितीसाठी आयडॉलचे संचालक प्रकाश महानवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. 

टॅग्स :परीक्षाऑनलाइनमुंबई