Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना गुगल डुडलद्वारे आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 12:19 IST

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 साली कल्याण शहरात झाला होता. आज त्यांच्या 153वी जयंतीनिमित्त त्यांचे सुंदर रेखाचित्र साकारुन डुडलद्वारे गुगलने त्यांना अनोख्या पद्धतीनं आदरांजली वाहिली आहे. 

मुंबई - भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 साली कल्याणमध्ये झाला होता. आज त्यांच्या 153वी जयंतीनिमित्त त्यांचे सुंदर रेखाचित्र साकारुन डुडलद्वारे गुगलने त्यांना अनोख्या पद्धतीनं आदरांजली वाहिली आहे. या रेखाचित्रात नाकात नथ व पारंपरिक मऱ्हाठमोळी साडी परिधान केलेल्या वेशामध्ये आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र त्या दाखवत आहेत.  बंगळुरुतील रेखाचित्रकार कश्मिरा सरोदे यांनी आनंदीबाईंचे हे सुंदर रेखाचित्र साकारले आहे. परदेशातून डॉक्टरकीची पदवी घेऊन येणा-या आनंदीबाई पहिल्या वहिल्या हिंदू महिल्या आहेत.

आनंदीबाई जोशी तमाम महिलांच्या एक आदर्श आहेत. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला होता. आनंदीबाईंचे पती गोपाळराव हे त्यांच्याहून वयाने 20 वर्षे मोठे होते. लहान वयात लग्न झाल्यानं त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.  पण त्यांच्या पतीने त्यांना  शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. अमेरिकेतील पेनसिलव्हेनिया येथील महिला वैद्यकीय महाविद्यालयातून आनंदीबाईंनी वैद्यकीय शिक्षणाची पदवी मिळवली. त्यानंतर ड्रेक्झल विद्यापीठ महाविद्यालयातून त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे स्वप्न घेऊन त्या मायदेशी परतल्या. 

वयाच्या 22 वर्षी झाले निधन परदेशातून डॉक्टरकीची पदवी मिळवल्यानंतर 1886 साली आनंदीबाई भारतात परतल्या. यादरम्यान कोल्हापूरतील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलच्या महिला प्रभागासाठी त्यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र यानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली. वयाच्या 22 व्या वर्षी क्षयरोगामुळे त्यांचे निधन झाले. 

टॅग्स :डॉक्टर