Join us  

अलविदा ! शशी कपूर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 3:31 PM

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर अखेर अनंतात विलीन झाले. सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शशी कपूर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबासह अख्खं बॉलिवूड उपस्थित होतं.

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर अखेर अनंतात विलीन झाले. सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शशी कपूर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबासह अख्खं बॉलिवूड उपस्थित होतं. कपूर कुटंबासहित सलीम खान, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, अनिल कपूर, संजय दत्त यांच्यासह अनेक कलाकार अंत्यविधीला उपस्थित होते. साश्रु नयनांनी यावेळी शशी कपूर यांना निरोप देण्यात आला. 

हिंदी चित्रपटसृष्टीवर अमिट ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर (७९) यांचे सोमवारी संध्याकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. गेली तीन आठवडे त्यांच्यावर कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही तीन मुले आहेत. 

शशी कपूर यांना फुप्फुसामध्ये जंतुसंसर्ग झाल्याचे निदान २0१४ साली झाले होते. त्याआधी त्यांची हृदय शस्त्रक्रिया झाली होती. शशी कपूर यांनी १६0 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यापैकी १२ चित्रपट इंग्रजी भाषेतील आहेत. नव्वदीच्या दशकापासून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे कमी केले होते. त्यानंतर त्यांचे फारसे चित्रपटही आले नाही.

कपूर यांच्या पत्नी जेनिफर यांचे १९८४ मध्ये कर्करोगाच्या आजाराने निधन झाल्यानंतर ते काहीसे खचले. त्यानंतर त्यांची प्रकृतीही खालावली. तेव्हापासून ते चित्रपटसृष्टीपासून दूर होते. २0११ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २0१५ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

शशी कपूर यांनी हिंदीसोबचत इंग्रजी चित्रपटांमध्येही अभिनयाचा ठसा उमटवला. इतकेच नव्हे तर निर्माते बनून त्यांनी ‘जुनून’ (१९७८), ‘कलियुग’ (१९८०), ‘३६ चौरंगी लेन’ (१९८१), ‘विजेता’ (१९८२), ‘उत्सव’ (१९८४) या नावाजलेल्या सिनेमांची निर्मिती केली. फार कमी अभिनेते स्टार झाल्यानंतर पुन्हा नाटकाकडे वळण्याचे धारिष्ट्य दाखवतात. मात्र, पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून शशी कपूर यांनी तिथेही अमूल्य योगदान दिले.

अभिनयप्रवासशशी कपूर यांचा जन्म १८ मार्च १९३८ रोजी कोलकाता येथे झाला. मुंबईतील मांटुग्याच्या डॉन बॉस्को शाळेत त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर हे प्रख्यात अभिनेते होते. मोठे बंधू राज कपूर व शम्मी कपूर यांच्याप्रमाणेच शशी कपूर यांनी वडिलांच्या पृथ्वी थिएटरमधूनच आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांचे बालपणीचे नाव बलबीरराज असे होते. पण पुढे ते शशी या नावानेच ओळखले जाऊ लागले.हिंदी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट हिरो अशी त्यांची ओळख होती. त्या काळात ते तरुणींच्या गळ््यातील ताईत होते. पृथ्वी थिएटरच्या शकुंतला या नाटकातून ते अभिनय क्षेत्रात आले. त्यानंतर १९४५ मध्ये के.एल.सहगल आणि सुरय्या यांच्या तदबीर सिनेमात त्यांनी भूमिका साकारली. राज कपूर यांच्या आग आणि आवारा या सिनेमात त्यांनी राज कपूर यांच्या बालपणाची भूमिका साकारली.तदबीरपासून ते १९५२ च्या दानापानीपर्यंत त्यांनी बालकलाकार म्हणून ११ चित्रपटांत काम केले. त्यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेला छोटा अशोककुमार आणि छोटा राज कपूर साºयांना भावला. पुढे राज कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या श्रीमान सत्यवादी आणि दुल्हा दुल्हन या सिनेमांसाठी त्यांनी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले. शशी कपूर यांना चित्रपटात घेण्यासाठी निर्माते-दिग्दर्शकांची त्याकाळी रांग लागायची. मात्र पृथ्वी थिएटरमध्ये शेक्सपियरसारख्या भूमिका त्यांनी साकारल्या. त्यामुळे त्यांना आशयघन सिनेमा आणि भूमिकेची ओढ होती. मी अभिनेता आहे, नाचणारा डोंबारी नाही, असे ते सांगत. कथानक न आवडलेल्या चित्रपटात ते भूमिका करण्यास नकार द्यायचे.काही काळानंतर यश चोप्रा यांच्या ‘धर्मपुत्र’ सिनेमाद्वारे त्यांचा नियमित म्हणता येईल, असा बॉलिवूड प्रवास सुरू झाला. शशी कपूर यांनी अनेक रोमँटिक सिनेमात काम केले. सूरज प्रकाश दिग्दर्शित ‘जब जब फूल खिले’ या सिनेमातील नंदा आणि शशी कपूर यांच्या जोडीची चांगलीच चर्चा झाली होती. ह्यजब जब फूल खिले’ या चित्रपटाने मोठे व्यावसायिक यश मिळविले. या चित्रपटानंतर शशी कपूर यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांना या चित्रपटानंतर अनेक चित्रपटांच्या आॅफर येऊ लागल्या. त्या काळात दोन-तीन शिफ्टमध्ये काम करत.

टॅग्स :शशी कपूरबॉलीवूड