पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप
By Admin | Updated: May 19, 2015 01:58 IST2015-05-19T01:58:15+5:302015-05-19T01:58:15+5:30
शानबाग यांची गेली चार दशके नि:स्वार्थपणे सेवा करणाऱ्या केईएम रुग्णालयातील परिचारिका व कर्मचाऱ्यांना त्यांचा निरोप घेताना अश्रू अनावर झाले.

पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप
शोकाकुल वातावरणात अरुणा शानबाग यांच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शानबाग यांची गेली चार दशके नि:स्वार्थपणे सेवा करणाऱ्या केईएम रुग्णालयातील परिचारिका व कर्मचाऱ्यांना त्यांचा निरोप घेताना अश्रू अनावर झाले. त्यातूनही त्यांच्या जिद्दीला सलाम करण्यासाठी ‘अरुणा शानबाग अमर रहे!’ अशा घोषणा देण्यात आल्या़
सायंकाळी पाचच्या सुमारास शानबाग यांचे पार्थिव स्मशानभूमीत आणले गेले. त्यांची अतोनात सेवा करणारा व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या शेकडो परिचारिका व कर्मचारी वर्ग शानबाग यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी उपस्थित होता. शानबाग यांना अंतिम जल देताना काही परिचारिकांचा अश्रूंचा बांध फुटला. हळूहळू एका एका परिचारिकेने त्यांना अंतिम जल दिले.
शानबाग यांच्या अंत्यसंस्कारासाठी
काही परिचारिकांनी सरण रचले. त्या वेळी ‘अरुणा शानबाग अमर रहे,’ अशा घोषणा परिचारिकांनी दिल्या. डॉ. अविनाश सुपे यांनी अग्नी दिल्यानंतरही काही परिचारिकांना अश्रू अनावर झाले. डॉ. सुपे यांनी शानबाग यांच्या कुटुंबप्रमुखाप्रमाणेच अंत्यविधी पार पाडला. तर कर्मचारी व परिचारिका वर्गाने दु:खद अंतकरणाने त्यांना निरोप दिला.
पुरुषांचा दृष्टिकोन बदलायला हवा!
अत्याचारामुळे अरुणाचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. अजूनही समाजातील परिस्थितीत बदल झालेले नाहीत. पुरुषांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. अनुवाद करण्याआधी मी एकदा अरुणाला भेटले होते. तो अनुभव मन सुन्न करणारा होता. तिला भेटायला जाताना मी निशिगंधाची फुले सोबत नेली होती. तिचे हातपाय तेव्हा आखडलेले होते. अरुणा कोमात नव्हती. तिच्या काही संवेदना जागृत होत्या. तिला भेटले तेव्हा तिच्या हाताची नखं वाढलेली होती. हे सगळेच मन अस्वस्थ करणारे होते. तिच्यावर ज्या पद्धतीने वॉर्डबॉय सोहनलालने अत्याचार केला, हे सगळे वाचून अंगावर शहारे आले होते. एका रात्री अरुणा खूप किंचाळत होती. त्या दिवशी सोहनलाल तिथे येऊन गेला, असे म्हटले जाते. पण असेच घडले असेल असे सांगू शकत नाही. तिची बोलण्याची क्षमता, दृश्य क्षमता गेली होती; पण तरीही ती प्रतिक्रिया द्यायची. तिने आयुष्यासाठी संघर्ष केला आहे.
-मीना कर्णिक, लेखिका
(गोष्ट अरुणाची, अनुवादक)
‘तो’ कुठे गेला ?
वॉर्डबॉय सोहनलाल वाल्मिकी याने पूर्ववैमानस्यातून परिचारिका अरूणा शानबाग हिच्यावर अत्याचार केला. या एका घटनेनंतर अरूणाचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. अरूणाचे हास्य कायमचेच मावळले. भावी आयुष्याची पाहिलेली स्वप्ने पुसट होत होत नामशेष झाली. वेदना होत असूनही व्यक्त करता येत नव्हत्या, भावना बोलून दाखवता येत नव्हत्या, अशा स्थितीत अरूणाने तब्बल ४२ वर्षे काढली. जगण्यासाठी प्रत्येक क्षणी तिचा संघर्ष चालू होता. तिच्या मनावर झालेला घाव तिने शेवटपर्यंत एकटीनेच झेलला. अरूणाला इतक्या हृदयद्रावक परिस्थितीत ढकलणाऱ्या सोहनलाल कुठे गेला? याचे उत्तर कोणाकडेच नाही. या प्रकरणात सोहनलाल याला न्यायालयाने ७ वर्षांची शिक्षा ठोठावली होती, हाच त्याच्या संदर्भातला शेवटचा उल्लेख सर्वश्रुत आहे. ही शिक्षाही खूनाचा प्रयत्न या आरोपाखाली झाली. मात्र त्यानंतर सोहनलाचे काय झाले याबाबत मुंबई अनभिज्ञ आहे.
‘आतून खूप हलल्यासारखे वाटतेय!’
खरेतर एखाद्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करताना मानसिक किंवा भावनिक कंगोरा अधिक लक्षात घेतला जातो. पण अरुणांची भूमिका करताना शारीरिक पातळीवरचा अभ्यास मी केला. म्हणजे त्या कायम बेडवर पहुडलेल्या असायच्या; तर त्यातले काही बारकावे मी भूमिकेत आणण्याचा प्रयत्न केला. कारण त्या बेडवरच असल्याने त्या सगळं केवळ ऐकत आहेत याचे भान मी ठेवले होते. कारण ऐकणे हीच एक क्रिया त्यांच्याकडून होत होती. त्या काहीच एक्स्प्रेस करू शकत नव्हत्या. कोमातल्या पहिल्या स्टेजचा पार्ट आम्ही या चित्रपटात घेतला आहे. याच वर्षात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मी जेव्हा त्यांच्याबाबतीत घडलेल्या घटनेचे चित्रीकरण केले किंवा त्या ६७ वर्षांच्या असतानाचा सिक्वेन्स केला़ त्यानंतर मला सेटवर ४-५ तास कुणाशी बोलूच नये असे वाटत होते. चित्रीकरण करतानाच मला एवढा ताण आला होता, की अरुणा यांनी प्रत्यक्षात हे सगळं कसे काय पेलवून नेले असेल, हे मला कोडे वाटते आणि तोंडातून शब्दही फुटत नाही.
अरुणांचे जगणे हा एक प्रकारचा लढा होता आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या व त्यांना सहकार्य करणाऱ्यांचा सुद्धा हा लढा होता. परिचारिकांनी अरुणांचा आपुलकीने सांभाळ केला. माणुसकीचे असे उदाहरण फारच अभावाने बघायला मिळते. त्यांचे सोसणे म्हणा किंवा त्यांचा करण्यात आलेला सांभाळ म्हणा; यातली माणुसकी पाहता त्यांच्यावरचा चित्रपट वगैरे सगळं दुय्यम वाटते. त्यांना आयसीयूमध्ये वगैरे हलवले, हे दोन दिवसांपूर्वी समजले होते; परंतु आज ही बातमी ऐकल्यानंतर मला आतून खूप हलल्यासारखे वाटतेय!
(शब्दांकन : राज चिंचणकर)
अरुणा यांची भूमिका चित्रपटात साकारण्यासाठी मी त्यांना भेटायला गेले होते, पण मला त्यांना भेटू दिले गेले नव्हते. बाहेरून मी केवळ त्यांचा आवाज ऐकला होता. हा आवाज मी चित्रपटात वापरला आहे. एकतर वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहता त्या ज्या स्थितीत होत्या, तशी अवस्था मी चित्रपटात येऊ देण्याचा प्रयत्न केला आहे. मनात एक स्केच ठरवून माझ्या डोळ्यांची किंवा शरीराची स्थिती कशी होईल याचा मी अभ्यास केला.