Mahavitran: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना दर ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे, यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या भांडुप परिमंडळात चांगला प्रतिसाद मिळत आहे. भांडुप परिमंडळात योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत ५ हजार अर्ज आले १,७०२ घरांच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनल्स बसवून वीज तयार केली जात आहे.
या योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स बसवून वीज निर्माण केली जाते. घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य होते. अतिरिक्त वीज महावितरणच्या जाळ्यात पाठवून उत्पन्नही मिळते. सौर ऊर्जा पॅनेल्स बसविण्यासाठी केंद्राकडून अनुदान मिळते. सूर्यघर प्रकल्पाचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना जवळपास मोफत वीज मिळत आहे. घरगुती ग्राहक व निवासी संकुलांनी या योजनेचा लाभ घ्यायला हवा, अशी माहिती 'महावितरण'ने दिली.
३० हजार रुपये अनुदान एका किलोवॅटसाठी
नोंदणी केल्यानंतर प्रकल्पासाठी ग्राहकांना पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्पासाठी बँकांनी सवलतीच्या दरात कर्ज देणे सुरू केले आहे.
अनुदान किती ?
छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे.
याबरोबरच गृहनिर्माण संस्था, ३ गृहसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व सामायिक उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये, असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते.