लोकमत विशेष, उमाकांत देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईला स्वस्त व हरित स्रोतांमधून वीज पुरविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली कुडूस (वाडा) बोरीवली ही एक हजार मेगावॅट क्षमतेची पारेषण वाहिनी एप्रिलमध्ये कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये मुंबईकरांना प्रतियुनिट ४०-५० पैसे स्वस्त वीज मिळू शकेल. राज्य वीज नियामक आयोगाने इंधन अधिभार निश्चित केल्यानंतर ग्राहकांना हा लाभ मिळेल.
मुंबईला साधारणपणे चार ते साडेचार हजार मेगावॅट विजेची गरज भासते. सध्या विक्रोळी-खारघर पारेषण वाहिनीतून (एसी) एक हजार मेगावॅट वीज मिळते. या क्षमतेमध्ये आणखी एक हजार मेगावॅटची भर नवीन पारेषण वाहिनीमुळे पडणार असून ही वीज 'एचव्हीडीसी' लिंकद्वारे मिळणार असल्याने गळतीचे प्रमाणही कमी असेल. मुंबईची विजेची मागणी सातत्याने वाढत असून उन्हाळ्याच्या काळात विजेची कमाल मागणी साडेचार हजार मेगावॅटपर्यंतही पोहोचते. या काळात राज्याच्या अन्य भागांमधील प्रकल्पांमधून उपलब्ध झालेली हरित ऊर्जा नवीन पारेषण वाहिनीच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे.
कुणाला मिळणार किती टक्के वीज?
या पारेषण वाहिनीतून मिळणाऱ्या विजेपैकी सुमारे २० टक्के वीज महावितरणला आणि अन्य वीज बेस्ट, टाटा आणि अदानी कंपनीलाही उपलब्ध होईल.
राज्यात सौरऊर्जा प्रकल्पांमधून आणि अन्य हरित स्रोतांमधून वीज उपलब्धतेत सातत्याने भर पडत आहे. ती आता थेट मुंबईपर्यंत आणता येणार आहे.
स्वस्त वीज उपलब्ध झाल्यावर संबंधित कंपन्यांच्या वीजदर व इंधन अधिभार निश्चितीच्या वेळी वीजदरामध्ये ४० ते ५० पैशांचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविता येऊ शकणार आहे.
नवीन पारेषण वाहिनीमुळे मुंबईच्या विजेच्या गरजेपैकी २०-२५ टक्के स्वस्त व हरित स्रोतांद्वारे वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वीजदर व इंधन अधिभार निश्चित करताना मुंबईकर वीज ग्राहकांना प्रति युनिट ४०-५० पैसे लाभ निश्चितपणे होईल. - अशोक पेंडसे, वीजतज्ज्ञ.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे या पारेषण वाहिनीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे पुढील महिन्यापासून स्वस्त हरित ऊर्जा उपलब्ध होईल. त्याचा लाभमुंबईतील सर्व वीज कंपन्यांच्या ग्राहकांना होऊन त्यांचे वीजदर कमी होतील. - विश्वास पाठक, स्वतंत्र संचालक, महावितरण
Web Summary : Mumbai residents will soon get cheaper electricity as the Kudus-Borivali power transmission line becomes operational in April. This will likely reduce per-unit costs by 40-50 paise. The new line will supply green energy, reducing reliance on expensive sources, benefiting consumers across all providers.
Web Summary : मुंबईकरों को जल्द ही सस्ती बिजली मिलेगी क्योंकि कुडूस-बोरीवली बिजली पारेषण लाइन अप्रैल में चालू हो जाएगी। इससे प्रति यूनिट लागत 40-50 पैसे कम होने की संभावना है। नई लाइन हरित ऊर्जा की आपूर्ति करेगी, जिससे महंगे स्रोतों पर निर्भरता कम होगी, और सभी प्रदाताओं के उपभोक्ताओं को लाभ होगा।