Join us

मुंबईकरांसाठी म्हाडाची खूशखबर! एकाच डिपॉजिटमध्ये आता भरा अनेक अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 20:38 IST

एकाच अनामत रकमेत अनेक ठिकाणी अर्ज करता येणार

मुंबई: मुंबईत हक्काचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी म्हाडानं एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या लॉटरीसाठी आता एकाच अनामत रकमेवर विविध ठिकाणी अर्ज करता येणार आहे. याआधी जितक्या घरांसाठी अर्ज तितक्या ठिकाणांसाठी वेगवेगळी अनामत रक्कम म्हाडाकडे भरावी लागत होती. मात्र आता केवळ एकाच अनामत रकमेवर अनेक अर्ज भरता येणार आहेत. म्हाडाचा अर्ज करताना अर्जदाराला एक ठराविक अनामत रक्कम भरावी लागते. प्रत्येक गटासाठी ही रक्कम वेगवेगळी असते. म्हाडाच्या लॉटरीत तीव्र स्पर्धा असते. त्यामुळे अनेकजण एकाच गटातील विविध ठिकाणी अर्ज करुन नशीब आजमवतात. मात्र अनेक ठिकाणी अर्ज करताना तितक्याच ठिकाणी अनामत रक्कम भरावी लागते. उदाहरणार्थ, अत्यल्प गटासाठी अनामत रक्कम 15 हजार रुपये इतकी आहे. या गटातून एखाद्या व्यक्तीनं तीन ठिकाणी अर्ज केल्यास त्याला 45 हजार रुपये (15 हजार x 3) अनामत रक्कम म्हणून भरावे लागतात. मात्र आता म्हाडाचा अर्ज भरताना केवळ 15 हजार रुपये भरावे लागतील. जितके अर्ज तितक्या वेळा अनामत रक्कम असा प्रकार यापुढे असणार नाही. त्यामुळे यापुढे अनेक ठिकाणी अर्ज करणं खिशाला परवडणारं असेल. 

टॅग्स :म्हाडामुंबई