Join us  

गुडन्यूज... मुंबईतील 45 % परिसर कोरोनामुक्त, कंटेनमेंट झोनची संख्याही घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 7:57 AM

कोरोना रुग्ण आढळल्याने मुंबईत १०,३६९ इमारती सील करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर आता त्यापैकी ४७१० म्हणजेच ४५ टक्के इमारती फ्री करण्यात आल्या आहेत.

मुंबई - देशातील कोरोना रुग्णांची संख्या अनलॉकमध्येही वाढत असून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्यात, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर परिस्थिती आता हळूहळू सुधरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात कोरोना रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणार कालावधी आता २६ दिवसांवर पोहोचला आहे. त्यामुळे, हळू हळू मुंबईतील कंटेनमेंट झोन आणि सील करण्यात आलेल्या इमारती पुन्हा पूर्ववत होत आहेत. 

राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण मात्र अद्याप कायम आहे. राज्यात रविवारी कोरोनाचे ३८७० नवीन रुग्ण पॉझिटीव्ह सापडले असून, एकूण रुग्णसंख्या १,३२,०७५ पर्यंत पोहोचली आहे. तर, राज्यात सद्यस्थितीत कोरोनाच्या ६० हजार १४७  रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत ६५ हजार ७४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तरीही, कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग कमी झाल्याने सील करण्यात आलेल्या इमारती मुक्त करण्यात येत आहेत.  

कोरोना रुग्ण आढळल्याने मुंबईत १०,३६९ इमारती सील करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर आता त्यापैकी ४७१० म्हणजेच ४५ टक्के इमारती फ्री करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या प्रादुर्भावामुळे मुंबईत अद्याप ५६५९ म्हणजेच ५५ टक्के इमारती सील आहेत. बीएमसीच्या अहवालानुसार अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा परिसरात सर्वाधिक ५१६ इमारती रिलीज करण्यात आल्या आहेत. सध्या केवळ २३० इमारतीच सील आहेत. इमारती सील करण्यात बोरीवलीचा दुसरा क्रमांक होता. येथे, तब्बल ९३५ इमारती सील करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ४७६ इमारती रिलीज झाल्या आहेत. 

कोरोना लॉकडाउन कालावधीत मुंबईत १२९३ कंटेनमेंट झोन बनविण्यात आले होते. त्यापैकी, सध्या ८७१ झोन कार्यरत असून ४२२ रिलीज करण्यात आले आहेत. एल वॉर्डअंतर्गत कुर्ला, साकीनाका परिसरात सर्वाधिक ३२८ कंटेनमेंट झोन होते. त्यापैकी २१६ झोन रिलीज केले आहेत. तर, मलबार हिल, महालक्ष्मी आणि रेसकोर्स येथे सर्वात कमी ५८ कंटेनमेंट झोन कार्यरत होते.  

दरम्यान, ''राज्यातील रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत आहे. सध्या हा कालावधी सुमारे २६ दिवसांवर गेला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.४९ टक्के एवढा आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईराजेश टोपे