Join us
Daily Top 2Weekly Top 5

शुभवार्ता : मान्सून हाेणार सक्रिय; मुंबई आणि विदर्भ जोडीने करणार पावसाचे स्वागत

By सचिन लुंगसे | Updated: June 21, 2023 06:27 IST

सद्य:स्थितीमध्ये मान्सून सिंधुदुर्ग, रत्नागिरी पट्ट्यात आहे.

मुंबई : जूनच्या शेवटच्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे वेगाने वारे वाहू लागतील. त्यामुळे २३ जूननंतर मान्सून सक्रिय होत पुढे सरकेल. वेगाने वाहणारे पश्चिमी वारे आणि कमी दाबाचे क्षेत्र या दोन घटकांमुळे कदाचित २५ ते २७ जूनदरम्यान मान्सून मुंबईसह विदर्भात एकाचवेळी दाखल होईल, असा अंदाज हवामान विषयक माहिती देणाऱ्या वेगरिज ऑफ दी वेदर संस्थेने वर्तविला आहे.

सद्य:स्थितीमध्ये मान्सून सिंधुदुर्ग, रत्नागिरी पट्ट्यात आहे. मंगळवारी त्याची काहीच प्रगती झालेली नाही. मात्र २३ जूननंतर मान्सून सक्रिय होईल. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह महाराष्टात चांगल्या पावसाची शक्यता आहे. विशेषत: कोकण पट्ट्यात चांगला पाऊस होईल. विदर्भातही चांगल्या पावसाची शक्यता असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यभरात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. 

येत्या १५ दिवसांत निम्म्या राज्यांत मान्सून बरसणार- येत्या १५ दिवसांत देशातील अर्ध्याहून अधिक राज्यांत पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्याने (आयएमडी) दिली. सोमवारपासून काही राज्यांत याची सुरुवातही झाली. - दिल्ली, बिहार, पूर्व उत्तर प्रदेशसह पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात पाऊस पडला आणि दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. - आसाम, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, पश्चिम मध्य प्रदेशात पुढील २४ तासांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. 

टॅग्स :पाऊस