मुंबई विमानतळावर १ कोटी ७० लाखांचे सोने जप्त
By मनोज गडनीस | Updated: January 22, 2024 17:29 IST2024-01-22T17:28:48+5:302024-01-22T17:29:26+5:30
तस्करीच्या चार प्रकरणात सीमा शुल्क विभागाची कारवाई.

मुंबई विमानतळावर १ कोटी ७० लाखांचे सोने जप्त
मनोज गडनीस,मुंबई : परदेशातून मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या चार लोकांना सोन्याच्या तस्करी प्रकरणी विमानतळावर कार्यरत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या चारही स्वतंत्र घटना असून याद्वारे एकूण १ कोटी ७० लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, यापैकी तीन लोक हे सौदी अरेबियातील जेद्दा येथून एकाच विमानाने मुंबईत दाखल झाले होते. त्यांच्याकडे असलेल्या ट्रॉलीबॅगेच्या आतील बाजूस प्रत्येकी एक किलो सोने लपविण्यात आले होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे तीन किलो सोने आढळून आले. गुलाम दस्तगीर रेहमानी, मोहम्मद इक्बाल आणि फजल खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, चौथ्या घटनेत दुबई येथून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाकडून २१० ग्रॅम सोने अधिकाऱ्यांनी जप्त केलेे आहे. त्याने पॅन्टच्या आतील बाजूला कमरेपाशी हे सोने लपवले होते. त्याला देखील अटक करण्यात आली आहे. हे सोने कुणी व कोणासाठी पाठवले, याचा अधिक तपास अधिकारी करत आहेत.