कोटीचे सोने चोरणारा गजाआड

By Admin | Updated: January 7, 2015 01:19 IST2015-01-07T01:19:20+5:302015-01-07T01:19:20+5:30

बनावट चावीच्या आधारे तिजोरीमधील एक कोटीचे दागिने घेऊन सेल्समन पसार झाल्याची घटना तीन महिन्यांपूर्वी घाटकोपर येथे घडली होती.

Gold stolen jewelery worth crores | कोटीचे सोने चोरणारा गजाआड

कोटीचे सोने चोरणारा गजाआड

घाटकोपर : बनावट चावीच्या आधारे तिजोरीमधील एक कोटीचे दागिने घेऊन सेल्समन पसार झाल्याची घटना तीन महिन्यांपूर्वी घाटकोपर येथे घडली होती. याबाबत गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाने कर्नाटक येथून या प्रकरणातील आरोपीला जेरबंद केले असून त्याच्याकडून चोरलेला मालदेखील हस्तगत करण्यात आला आहे.
घाटकोपर पश्चिम येथे मणिरत्नम ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दुकान आहे. ७ आॅक्टोबर २०१४ ला नेहमीप्रमाणे मालकाने दुकान उघडले. त्यानंतर दुपारी जेवणासाठी मालक घरी गेल्यानंतर या दुकानात काम करणाऱ्या सेल्समनने बनावट चावीच्या आधारे दुकानात असलेली तिजोरी उघडली. त्यानंतर या तिजोरीमधून सोने आणि चांदी असे एकूण १ कोटी १३ लाखांचे दागिने घेऊन त्याने पोबारा केला. काही वेळानंतर दुकानाचे मालक आल्यानंतर हा सेल्समन दुकानात नव्हता. दुकानातील तिजोरीदेखील उघडण्यात आली होती. तसेच सर्व दागिने गायब झाल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. स्वत:ला सावरत त्यांनी तत्काळ घाटकोपर पोलिसांना याबाबत माहिती दिली.
त्यानुसार घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच ही चोरी दुकानात काम करणाऱ्या सेल्समननेच केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. मात्र घटनेला अनेक दिवस उलटूनदेखील घाटकोपर पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागत नव्हते. याच दरम्यान या चोरीचा तपास गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागामार्फतही समांतर सुुरू होता. याच दरम्यान हा आरोपी कर्नाटक राज्यात असल्याची गुप्त माहिती मालमत्ता विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ एक पथक कर्नाटक येथे पाठवले. त्यानुसार या पथकाने येथील हिरीयुर परिसरात सापळा रचून या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्याकडून १ किलो १४६ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले आहेत. शिवाय सोने वितळवण्याची मशिन आणि वजन काटादेखील पोलिसांनी जप्त केला आहे. सोमवारी या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)

च्मालमत्ता विभागाने अटक केलेला हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याने यापूर्वी अशाच प्रकारे ज्वेलर्समध्ये कामाला लागून अनेक चोऱ्या केल्या आहेत. नवी मुंबईत त्याच्यावर एक बलात्काराचा तर एक चोरीचा गुन्हादेखील दाखल आहे.

च्तसेच वर्षभरापूर्वी त्याने कुर्ल्यातील मधुरम ज्वेलर्समधूनदेखील ६० लाखांचे दागिने घेऊन पोबारा केला होता. कुर्ला पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर सहा महिन्यांत तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर तो घाटकोपरच्या या मणिरत्नम ज्वेलर्समध्ये कामाला लागला होता.

Web Title: Gold stolen jewelery worth crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.