Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोखले पुलाची जागा पालिकेकडे; पश्चिम रेल्वेने यंत्रसामग्री हलविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 11:32 IST

२०१९ मध्ये सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले.

मुंबई : पश्चिम रेल्वेने अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या गोखले उड्डाणपुलाचे गर्डर काढण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. रेल्वेची सर्व यंत्रसामग्री हलविण्यात आली आहे. आता नवीन पूल बांधण्यासाठी शनिवारी मुंबई महापालिकेच्या ताब्यात रेल्वेची जागा देण्यात आली आहे. आता पालिका नवीन पुलांची पुनर्बांधणी करणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

गोखले पूल १९७५ मध्ये बांधण्यात आला होता. २०१९ मध्ये सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यात  गोखले पुलाच्या दुरुस्तीचा सल्ला दिला होता. त्यानुसार, पालिकेने आपल्या हद्दीतील पुलाचे काम सुरू केले. मात्र, रेल्वे हद्दीतील गोखले उड्डाणपूल धोकादायक असल्याने रेल्वे हद्दीतील उड्डाणपूल पाडून नवा बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यानुसार, ७ नोव्हेंबर, २०२२ रोजी अंधेरी येथील गोखले उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पालिकेद्वारे त्याची पुनर्बांधणी केली जात आहे. गोखले पुलाच्या रेल्वेच्या भागाचे केवळ पाडण्याचे काम पश्चिम रेल्वेकडे सोपविण्यात आले. रेल्वेच्या भागाचे काम पश्चिम रेल्वेने ट्रॅफिक ब्लॉक करून युद्धपातळीवर पूर्ण केले. 

सहा दिवस आधीच हस्तांतर

गोखले पुलाच्या पश्चिमेकडील भाग पाडण्याचे काम­­­ पश्चिम रेल्वेने पूर्ण केले आणि १६  मार्च, २०२३ रोजी बीएमसीकडे सुपुर्द केले. ११ आणि १२ मार्च रोजी हाती घेण्यात आलेल्या नुकत्याच झालेल्या ब्लॉक दरम्यान, सर्व १६  स्टील गर्डरचे डी-लाँचिंग आणि पुलाच्या पूर्वेकडील दोन स्पॅनचे तोडण्याचे  काम पश्चिम रेल्वेने पूर्ण केले आहे. रेल्वेच्या भागासह नवीन उड्डाणपूल बांधण्यासाठी संपूर्ण जागा आता पालिकेकडे  ३१ मार्च रोजी निश्चित करण्यात आली होती, परंतु रेल्वेने जलदगतीने काम पूर्ण करून २५ मार्च रोजी नवीन उड्डाणपूल बांधण्यासाठी संपूर्ण जागा  देण्यात आली आहे. आता पालिका येथे नव्याने पुलाचे बांधकाम करणार आहे.

टॅग्स :मुंबई