Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ramesh Deo : देव गेले देवाघरी! ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 07:41 IST

Ramesh Deo : उत्फुल्लतेचा झरा असलेले, सर्व प्रकारच्या भूमिका लीलया साकारणारे, मनोरंजनाच्या सर्व माध्यमांतून रसिकमान्यता लाभलेले सदाबहार अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी रात्री ८.३०च्या सुमारास कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.

 मुंबई : उत्फुल्लतेचा झरा असलेले, सर्व प्रकारच्या भूमिका लीलया साकारणारे, मनोरंजनाच्या सर्व माध्यमांतून रसिकमान्यता लाभलेले सदाबहार अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी रात्री ८.३०च्या सुमारास कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा, अभिनेते अजिंक्य आणि निर्माता-दिग्दर्शक अभिनय ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ३० जानेवारी रोजी कुटुंबीयांसह वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी विलेपार्ले येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. 

शेकडो हिंदी आणि मराठी चित्रपट, मराठी नाटके, तसेच टीव्ही मालिका, अनेक जाहिराती असा रमेश देव यांचा प्रदीर्घ प्रवास आहे. ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी मराठीत, आरती या राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटातून हिंदीत पदार्पण केले. खलनायक, नायक, सहनायक आदी व्यक्तिरेखा ते सहजतेने साकारत असत. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, धर्मेद्र या अभिनेत्यांसह त्यांनी पडदा गाजविला. आनंद, आप की कसम, मेरे अपने, ड्रीम गर्ल या सिनेमातील त्यांच्या व्यक्तिरेखा रसिकांच्या पसंतीस उतरल्या. मराठीत जेता, वासुदेव बळवंत फडके, सुवासिनी, जगाच्या पाठीवर, माझा होशील का, असे शेकडो चित्रपट त्यांनी केले.

 

टॅग्स :रमेश देवमुंबई