महत्त्वाच्या ३८२ स्थळांच्या सफाईचे लक्ष्य
By Admin | Updated: December 27, 2014 01:02 IST2014-12-27T01:02:26+5:302014-12-27T01:02:26+5:30
स्वच्छ सुंदर मुंबईचे स्वप्न साकार करण्यासाठी पालिकेने हाती घेतलेल्या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात वर्दळीच्या व अतिमहत्त्वाच्या स्थळांच्या स्वच्छतेला

महत्त्वाच्या ३८२ स्थळांच्या सफाईचे लक्ष्य
मुंबई : स्वच्छ सुंदर मुंबईचे स्वप्न साकार करण्यासाठी पालिकेने हाती घेतलेल्या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात वर्दळीच्या व अतिमहत्त्वाच्या स्थळांच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार आहे़ अशी ३८२ स्थळे पालिकेने शोधून काढली आहेत़ त्या ठिकाणी निर्माण होणारा कचरा, लोकांची वर्दळ, आवश्यक मनुष्यबळ व स्वच्छतेसाठी लागणारी साधन-सामग्रीचा आढावा घेऊन स्वच्छतेचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे़
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियानामुळे मुंबईतही सफाईची मोहीम पुनर्जीवित करण्यात आली़ त्यानुसार पालिकेने सर्वप्रथम स्वगृहापासून सफाईला सुरुवात केली आहे़ दर शुक्रवारी प्रत्येक कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेनंतर कर्मचारी दोन तास श्रमदान करीत आहेत़ त्यानंतर आता सार्वजनिक व अतिमहत्त्वाच्या स्थळांच्या स्वच्छतेसाठी पालिकेने कंबर कसली आहे़
पर्यटनस्थळ, वर्दळीच्या ठिकाणी सफाईपासून जमा झालेला कचरा डम्पिंग ग्राउंडवर नेण्यापर्यंतची सर्व व्यवस्था तपासून त्रुटी दूर करण्यात येणार आहेत. या ३८२ स्थळांचे थर्ड पार्टी आॅडिटही केले जाणार आहे़ दर आठवड्याला विभागस्तरावर या स्थळांचा आढावा घेऊन नियमित सफाईसाठी आवश्यक साधने पुरविण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले़ (प्रतिनिधी)