शाळेत जाताय, बेस्ट मोफत!
By Admin | Updated: August 11, 2015 04:42 IST2015-08-11T04:42:22+5:302015-08-11T04:42:22+5:30
महापालिकेच्या शाळांतील बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी गटनेत्यांची बैठक झाली.

शाळेत जाताय, बेस्ट मोफत!
मुंबई : महापालिकेच्या शाळांतील बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी गटनेत्यांची बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला.
बैठकीला उपमहापौर अलका केरकर, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, आयुक्त अजय मेहता, सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे, शिक्षण समितीच्या अध्यक्षा रितू तावडे, बेस्ट समितीचे अध्यक्ष अरविंद दुधवडकर, भाजपा गटनेते मनोज कोटक, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, अतिरिक्त आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, संजय मुखर्जी, संजय
देशमुख आणि पल्लवी दराडे हे उपस्थित होते.
अरविंद दुधवडकर यांनी महापौरांना पत्र देऊन महापालिकेच्या विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याची मागणी केली होती. महापालिकेच्या शाळांतून शिक्षण घेणारे विद्यार्थी हे अत्यंत गरीब कुटुंबातील असतात. त्यांना सकस आहार, पुस्तके, लेखन साहित्य इत्यादी प्रकारच्या शालोपयोगी २७ बाबींचे दरवर्षी महापालिकेतर्फे विनामूल्य वाटप करण्यात येते. याच धर्तीवर शहर व उपनगरांतील काही महापालिका शाळा बऱ्याच अंतरावर आहेत.
अत्यंत गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करता येणे गरजेचे आहे, त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या विशेष शालेय बसफेरी पासेसचा खर्च महानगरपालिकेने करावा, अशी त्यांची मागणी होती.
महापौरांनी हा विषय गटनेत्यांच्या बैठकीपुढे ठेवला. हा एक चांगला विषय असून महापालिकेच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना अधिक अंतर कापत शाळेत चालत यावे लागते. परिणामी, विद्यार्थ्यांना थकवाही येतो. तेव्हा मोफत बेस्टचा पास दिला तर याचे फायदे अधिक होतील, असे महापौरांनी या वेळी सांगितले. यावर उपस्थित सर्व गटनेत्यांनी या विषयाला मंजुरी दिली. (प्रतिनिधी)
शैक्षणिक टक्का वाढण्यास मदत
अरविंद दुधवडकर यांनी महापौरांना पत्र देऊन महापालिकेच्या विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याची मागणी केली होती. बसेसचा पास विनामूल्य उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रोत्साहन मिळेल.
तसेच महापालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आणखीन वाढ होईल, खऱ्या अर्थाने शैक्षणिक टक्का वाढविण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल पडेल, असे दुधवडकर यांनी म्हटले होते.