Join us  

कल्याण ते सीएसएमटी जा, म्युझिअमचे तिकीट चिकटवा, पहिलीतील विद्यार्थ्यांसाठी शाळेचा प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 3:57 AM

शिक्षणाचा ताण कमी करण्यासाठी काही वर्षांपासून शिक्षण पद्धतीत बदलाच्या नावाखाली प्रोजेक्ट वर्कचे फॅड शाळांमध्ये सुरू झाले आहे. विशेषत: खासगी आणि विनाअनुदानित शाळांमध्ये तर सर्रास या पद्धतीचा वापर करून मूल्यांकन केले जाते.

- सीमा महांगडेमुंबई  - शिक्षणाचा ताण कमी करण्यासाठी काही वर्षांपासून शिक्षण पद्धतीत बदलाच्या नावाखाली प्रोजेक्ट वर्कचे फॅड शाळांमध्ये सुरू झाले आहे. विशेषत: खासगी आणि विनाअनुदानित शाळांमध्ये तर सर्रास या पद्धतीचा वापर करून मूल्यांकन केले जाते. अशाच प्रकारे कल्याणमधील एका शाळेने तर चक्क पहिलीतील मुलांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील आरबीआय म्युझियमला भेट देऊन त्याचे तिकीट प्रकल्प वहीत चिकटवण्यास सांगितल्याचे समोर आले आहे. शिवाय तेथे भेट देऊन आल्यावर तेथील छायाचित्रही वहीत चिकटविण्यास सांगितले असून हा प्रकल्प अनिवार्य असल्याची नोंद प्रकल्प वहीत केली आहे. केवळ प्रकल्प वहीत नोंद करण्यासाठी मुलांना घेऊन एवढा मोठा प्रवास करावा लागणार असल्याने पालकांमध्ये नाराजी आहे. शैक्षणिक प्रकल्पाच्या नावाखाली लहान मुलांचे हाल करण्यात येत असल्याचा आरोप पालकांकडून होत आहे.घटक चाचण्या, सत्र परीक्षा यांची संख्या कमी करून अनुभवाधारित शिक्षण प्रक्रिया शाळांमधून राबवली जाणे हा आनंददायी शिक्षण पद्धतीचा पाया आहे. मात्र खासगी शाळांमध्ये प्रकल्पासाठी आवश्यक त्या वस्तू पुरविण्यासाठी पालकांना भुर्दंड सोसावा लागत आहे. कल्याण पश्चिमेतील श्रीमती के.सी. गांधी या म्युझियमचे तिकीट आणि फोटोसाठी पहिलीतील मुलाला घेऊन कल्याण ते सीएसएमटी हा प्रवास करावा लागणार आहे तो वेगळा. मुळात पहिलीच्या मुलांना प्रकल्प देताना आरबीआय ही संकल्पना समजणार आहे का? त्यांच्या वयोमानाप्रमाणे हा प्रकल्प त्यांच्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या किती उपयुक्त ठरेल, याचा विचार शाळेने केला का, असा सवाल पालक करत आहेत. मात्र, पाल्याचे भविष्यात कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी गप्प बसत असल्याची माहिती एका पालकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.शाळेतील या अजब शैक्षणिक प्रकल्पासंदर्भात माहिती विचारण्यासाठी शाळेशी संपर्क साधला असता कोणीही उपलब्ध झाले नाही. तर, मुलांच्या वयाला न झेपणारे प्रकल्प शाळेकडून दिले जात असून या प्रकल्पाचे बहुतांश काम हे घरीच करायला देण्यास दिले जाते. त्यामुळे प्रकल्प आई-वडीलच पूर्ण करतात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान मिळतच नाही, मग यातून काय साध्य होणार, असा सवाल शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.मुलांची क्षमता ओळखणे गरजेचेशैक्षणिक प्रकल्प आणि अधिकाधिक गुण देण्याच्या नावाखाली जर लहान मुलांना त्यांच्या क्षमतेच्या पलीकडचे प्रकल्प शाळेकडून करण्यास सांगितले जात असेल तर ते चुकीचेच आहे. शैक्षणिक प्रकल्प म्हणजे ज्यातून विद्यार्थ्यांना काही शिकण्यासारखे असेल, त्यांचे ज्ञान वाढेल, माहिती मिळेल असा आहे. त्यामुळे असे प्रकल्प द्यायला हवे. प्रकल्पाच्या नावाखाली पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना थेट कल्याणहून सीएसएमटीपर्यंतचा प्रवास करायला लावण्याने शैक्षणिक उद्दिष्ट साध्य होणार नाही.- सचिन पवार, अध्यक्ष स्टुडण्ट लॉ कौन्सिल 

टॅग्स :विद्यार्थीशिक्षण क्षेत्रमुंबई