Join us  

उड्डाणांच्या वक्तशीरपणामध्ये गो एअर प्रथम; एअर इंडियाला शेवटचे स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 7:06 AM

विमान उड्डाणांच्या वक्तशीरपणामध्ये गो एअर कंपनीने प्रथम स्थान पटकावले आहे. मे महिन्यातील उड्डाणांमध्ये ९१.८ टक्के वक्तशीरपणा मिळविण्यात या कंपनीला यश आले आहे.

मुंबई : विमान उड्डाणांच्या वक्तशीरपणामध्ये गो एअर कंपनीने प्रथम स्थान पटकावले आहे. मे महिन्यातील उड्डाणांमध्ये ९१.८ टक्के वक्तशीरपणा मिळविण्यात या कंपनीला यश आले आहे.मुंबई, दिल्ली, बंगळुरू व हैदराबाद या चार प्रमुख महानगरांमधील मे महिन्यातील हवाई वाहतुकीचा अभ्यास केल्यावर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या अहवालामध्ये ही आकडेवारी प्रकाशित करण्यात आली आहे. उड्डाणे वेळेवर होण्यामध्ये एअर एशिया ८९.१ टक्के, इंडिगो ८७.४ टक्के, विस्तारा ८६.६ टक्के, स्पाइसजेट ७४.७ टक्के व सर्वात कमी म्हणजे, ७०.३ टक्क्यांसहित एअर इंडियाला या यादीत शेवटचे स्थान मिळाले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतुकीमध्ये गो एअर ९१.८ टक्के, एअर एशिया ९०.३ टक्के, विस्तारा ८७.९ टक्के, इंडिगो ८७.२ टक्के, एअर इंडिया ७२.४ टक्के व स्पाइसजेट ७१.३ टक्के असा वक्तशीरपणा नोंदविण्यात आला आहे.जानेवारी ते मे या कालावधीत एअर इंडियामार्फत ७६ लाख ७७ हजार प्रवाशांनी प्रवास केला, तर खासगी विमान कंपन्यांद्वारे ५ कोटी ९ लाख ७७ हजार प्रवाशांनी प्रवास केला. एअर इंडियाद्वारे मे महिन्यात १६ लाख ५३ हजार प्रवाशांनी प्रवास केला. जानेवारी ते मे या महिन्यांमध्ये मे महिन्यात एअर इंडियाद्वारे प्रवास केलेल्या प्रवाशांची संख्या मे महिन्यात सर्वाधिक आहे. मे महिन्यात इतर खासगी कंपन्यांमार्फत १ कोटी ५ लाख ५४ हजार प्रवाशांनी प्रवास केला. एकूण प्रवाशांपैकी ८६.५ टक्के हिस्सा खासगी कंपन्यांचा आहे, तर एअर इंडियाचा हिस्सा १३.५ टक्के आहे.

टॅग्स :विमान