लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मोबाइल रिपेअरिंगसाठी दिल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून दीड लाख रुपये ट्रान्सफर झाले. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
५३ वर्षीय पोलिस कर्मचारी किरण बडगुजर यांची फसवणूक झाली आहे. मोबाइल सतत गरम होत असल्याने २८ जुलै रोजी त्यांनी मोबाइल सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी दिला. ३० तारखेला मोबाइल दुरुस्त करून मिळाला. तरीही फोन गरम होत असल्याने त्यांनी पुन्हा फोन मोबाइल सेंटरमध्ये दिला. दरम्यान, सात दिवसांनंतर मोबाइल दुरुस्त करून त्यांना देण्यात आला. १५ ऑगस्ट रोजी बँकेचे मोबाइल ॲप्लिकेशन ओपन होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना संशय आला. त्यांनी बँक खाते तपासताच त्यात पावणे चार लाख खात्यात शिल्लक असल्याचे दिसले.
चार क्रमांकांवरून पाठविल्या लिंक
- १६ ऑगस्ट रोजी १२ व्यवहारात बँक खात्यातून १ लाख ६० हजार रुपये डेबिट झाल्याचे दिसून आले. या व्यवहारांसाठी कोणतेही ओटीपी किंवा कॉल प्राप्त झाले नव्हते.
- विशेष म्हणजे, मोबाइलच्या टेक्स्ट मेसेजेसमध्ये चार अनोळखी मोबाइल क्रमांकांवरून लिंक पाठविल्याचे दिसले. त्या लिंक बडगुजर यांनी स्वतः पाठविलेल्या नव्हत्या. त्यामुळे कोणीतरी मोबाइल हॅक करून फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले.
- १७ व १८ ऑगस्ट रोजीही १० हजार रुपये मोनू कुमार वर्मा याच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाल्याचे दिसून आले. अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिस तपास करत आहेत.