"मुंबईतील सोसायट्यांना रात्री १२ वाजेपर्यंत नवरात्रोत्सव साजरा करण्याची विशेष परवानगी द्या"
By मनोहर कुंभेजकर | Updated: September 30, 2023 18:50 IST2023-09-30T18:49:58+5:302023-09-30T18:50:31+5:30
खासदार गोपाळ शेट्टी यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र

"मुंबईतील सोसायट्यांना रात्री १२ वाजेपर्यंत नवरात्रोत्सव साजरा करण्याची विशेष परवानगी द्या"
मनोहर कुंभेजकर, मुंबई: मुंबई शहरात व विशेष करून उपनगरात मोठं-मोठ्या सोसायट्यांमधील रहिवासी येत्या 15 ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करणार आहे. मुंबई शहराची परिस्थिती पाहता येथील नागरिक आपला काम व व्यवसाय आटोपून रात्री घरी नऊ ते दहा वाजेपर्यंत घरी पोहोचतात. रात्री दहा वाजता नवरात्र उत्सव कायद्यानुसार बंद करण्यात येत असल्यामुळे अनेक नवरात्री प्रेमी नागरिकांना या उत्सवाचा लाभ घेता येत नाही. मुंबई शहरात व विशेष करून उपनगरात मोठं-मोठ्या सोसायट्यांमधील रहिवासी एकत्र येत नवरात्र उत्सव साजरा करतात. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांमधल्या नवरात्र उत्सवाला रात्री १२ वाजेपर्यंत नियमानुसार कमी आवाजात विशेष परवानगी द्यावी, असे पत्र उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
आपल्याकडे उत्तर मुंबईच्या अनेक गृहनिर्माण सोसायट्यांच्या रहिवासी संघाने रात्री १२ वाजेपर्यंत नवरात्री उत्सव साजरा करायला परवानगी मिळण्यासाठी आपण खासदार या नात्याने शासनाकडे मागणी करावी अशी पत्रे दिल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
व्यावसायिक स्वरूपाच्या नवरात्र उत्सव निश्चित १० वाजेपर्यंत बंद करणे व्यवहार्य आहे. कारण खूप मोठ्या आवाजात ते कार्यक्रम साजरा करीत असतात.परंतू सोसायटी परिसरात कमी आवाजात उत्सव साजरा करण्यास काहीच हरकत नसावी असे खासदार गोपाळ शेट्टी यांनी शेवटी पत्रात म्हंटले आहे.