Join us  

'...त्यापेक्षा 100 कोटी मला द्या'; बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला 'शोभा डें'चा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 3:05 PM

लेखिका शोभा डे नेहमीच आपल्या ट्विटमुळे किंवा वादग्रस्त कमेंटमुळे चर्चेत असतात.

मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला विरोध दर्शविणारे ट्विट लेखिका शोभा डे यांनी केलं आहे. कुणाला हवी आहेत स्मारकं, आम्हाला तर रुग्णालये आणि शाळा पाहिजेत, असे म्हणत शोभा डे यांनी सर्वच स्मारकाला आपला विरोध दर्शवला आहे. मात्र, बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या प्रस्तावित स्मारकाच्या गणेशपूजन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर, डे यांनी हे ट्विट केलंय. 

लेखिका शोभा डे नेहमीच आपल्या ट्विटमुळे किंवा वादग्रस्त कमेंटमुळे चर्चेत असतात. आताही डे यांनी 100 कोटींच्या स्मारकाबद्दल ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. एक नागरिक म्हणून मला 100 कोटी रुपये खर्च करण्याचा अधिकार द्या. मग, पाहा मी कशाप्रकारे या 100 कोटी रुपयांची गुंतवणूक लोकांच्या कल्याणासाठी करते, असे डे यांनी म्हटले आहे. तसेच स्मारकं कुणाला हवी आहेत? आम्हाला तर शाळा आणि रुग्णालये पाहिजेत, असे ट्विट शोभा डे यांनी केलंय. डे यांच्या टि्वटमुळे शिवसैनिकांमध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क भागातील महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरेंचं हे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाचं गणेशपुजन नुकतंच पार पडला. त्यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमाला हजेरी लावत एमएमआरडीएच्या माध्यमातून 100 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. त्यानंतर, शोभा डे यांनी ट्विट करुन मुख्यमंत्री आणि शिवसेनेला टार्गेट केलंय. 

टॅग्स :शोभा डेबाळासाहेब ठाकरेमुंबई