लाडक्या मुख्यमंत्र्यांना पर्यावरणप्रेमाचे धडे द्या!; मल्लिकार्जुन खर्गे यांची पंतप्रधान मोदींवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 01:25 IST2019-10-07T01:25:31+5:302019-10-07T01:25:56+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी टिळक भवन येथे उभारण्यात आलेल्या अद्यावत वॉररूमचे खर्गे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.

लाडक्या मुख्यमंत्र्यांना पर्यावरणप्रेमाचे धडे द्या!; मल्लिकार्जुन खर्गे यांची पंतप्रधान मोदींवर टीका
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणाबाबतची संवेदनशीलता आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनासुद्धा सांगावी, असा टोला हाणतानाच अटकेत असलेल्या आरे कारशेड विरोधी आंदोलक विद्यार्थ्यांची, तरुणांची सुटका करावी, अशी मागणी प्रदेश कॉँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी केली. सरकारने पोलिसी बळाचा वापर करत आरेमधील झाडांची कत्तल केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
विधानसभा निवडणुकीसाठी टिळक भवन येथे उभारण्यात आलेल्या अद्यावत वॉररूमचे खर्गे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यानंतर, आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आरे आंदोलनाविषयी भाष्य केले. सरकारने पोलिसी बळाचा वापर करून मध्यरात्री आरेमधील झाडांची कत्तल केली. याला विरोध करणाऱ्या मुंबईकरांना, तरुण विद्यार्थी आणि पर्यावरणवाद्यांना पोलिसांनी अटक करून जेलमध्ये डांबले आहे. डिस्कव्हरी चॅनलच्या मॅन वर्सेस वाइल्ड या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणप्रेमाचे गोडवे गायले होते. ‘माझ्या काकांना लाकडाचा व्यवसाय करायचा होता, पण झाडांमध्येही जीव असतो़ त्यामुळे लाकडाचा व्यवसाय करू नको, असे माझ्या आजीने सांगितले होते,’ अशी आठवण सांगत मोदी यांनी आपण पर्यावरणाबाबत किती संवेदनशील आहोत, सांगितले होते. हीच संवेदनशीलता पंतप्रधानांनी आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना सांगावी आणि अटकेतील तरुण आणि विद्यार्थ्यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश द्यावेत, असे खर्गे म्हणाले.
विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात खर्गे म्हणाले की, भाजप-शिवसेना सरकारच्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. सर्वच समाजघटकांमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. दुष्काळ, पूर हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, आर्थिक मंदी या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष सरकारला घेरणार आहे, असे खर्गे यांनी सांगितले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसची वॉररूम सज्ज आहे. या वॉररूमच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची भूमिका मतदारापर्यंत पोहोचणे आणि प्रचाराचे समन्वय साधण्याचे काम केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीची पूर्ण तयारी झाली आहे. राज्यभरात स्टार प्रचारकांच्या सभा होणार आहेत. वॉररूमच्या माध्यमातून सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून काँग्रेस पक्ष अधिक जोरदार पद्धतीने प्रचार अभियान राबवेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.