केंद्राच्या धर्तीवर राज्यातही ११ टक्के महागाई भत्ता द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:06 IST2021-07-20T04:06:11+5:302021-07-20T04:06:11+5:30

मुंबई : केंद्र शासनाने मंजूर केलेल्या ११ टक्के महागाई भत्त्याप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाही वाढीव महागाई भत्ता त्वरित देण्यात यावा, ...

Give 11% DA in the state on the lines of the Center | केंद्राच्या धर्तीवर राज्यातही ११ टक्के महागाई भत्ता द्या

केंद्राच्या धर्तीवर राज्यातही ११ टक्के महागाई भत्ता द्या

मुंबई : केंद्र शासनाने मंजूर केलेल्या ११ टक्के महागाई भत्त्याप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाही वाढीव महागाई भत्ता त्वरित देण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२० पासून चार, १ जुलै २०२० पासून तीन आणि १ जानेवारी २०२१ पासून चार टक्के असा एकूण ११ टक्के वाढीव महागाई भत्ता मंजूर झाला आहे. त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण २८ टक्के इतका महागाई भत्ता झाला आहे. केंद्राप्रमाणेच महागाई भत्ता वाढ राज्यात देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. मात्र, हा निर्णय घेण्यात उशीर होत असल्यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची थकबाकी शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढत आहे. जुलै २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीतील ५ महिन्यांची थकबाकीदेखील अद्याप राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. थकबाकीमुळे महागाई भत्त्याचे प्रमाण वाढत आहे. महागाई भत्त्याची मागील ५ महिन्यांची थकबाकी तसेच केंद्राप्रमाणे झालेली ११ टक्के महागाई भत्ता वाढ त्वरित देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही महासंघाने केली आहे.

Web Title: Give 11% DA in the state on the lines of the Center