विवाह मंडळाच्या नावाखाली मुलींचा सौदा

By Admin | Updated: May 5, 2015 02:46 IST2015-05-05T02:46:11+5:302015-05-05T02:46:11+5:30

मुंबईतून गुजरातमध्ये विक्रीसाठी नेल्या जाणाऱ्या मुलींचा सौदा तेथील एका विवाह मंडळाच्या माध्यमातून होत होता, अशी धक्कादायक माहीती पायधुनी पोलिसांच्या

Girls deal in the name of marriage board | विवाह मंडळाच्या नावाखाली मुलींचा सौदा

विवाह मंडळाच्या नावाखाली मुलींचा सौदा

मनीषा म्हात्रे, मुंबई
मुंबईतून गुजरातमध्ये विक्रीसाठी नेल्या जाणाऱ्या मुलींचा सौदा तेथील एका विवाह मंडळाच्या माध्यमातून होत होता, अशी धक्कादायक माहीती पायधुनी पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. गेल्या महिन्यात पायधुनी पोलिसांनी मुलींची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर सातत्याने तपास करून पोलिसांनी या रॅकेटच्या सूत्रधारासह प्रमुख आरोपींना बेड्या ठोकल्या.
राजू उर्फ रमेशसह साथीदार मिराबाई साळवे, आणि वंजूभाई सोलंकी अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यापैकी राजू हा या टोळी सूत्रधार असून सोलंकीची अहमदाबादेत विवाह नोंदणी संस्था आहे.
अहमादबादच्या राजूची पत्नी त्याला सोडून निघून गेली. दुसऱ्या लग्नासाठी तो मुलीच्या शोधात होता. त्यासाठी त्याने नातेवाईक मिराबाईशी संपर्क साधला. मुंबईत कॅटरींगमध्ये काम करणाऱ्या मिराबाईने तिच्या ओळखीतल्या सिमासोबत राजूची ओळख करुन दिली. त्या बदल्यात तिने राजूकडून पैसे मागितले. तेव्हा राजूनेही विचार बदलला. मिराबाईला १२ हजार रूपये देऊन त्याने सीमासोबत लीव्ह इन रिलेशन ठेवले. थोडया दिवसांनी सिमानेच राजूकडे पैशांची मागणी सुरू केली. या स्वत:च्या अनुभवनातून त्याने झटपट पैसा कमावण्यासाठी शक्कल लढवली.
सीमाप्रमाणे मुंबईतून मुली आणायच्या आणि त्या तेथील विवाहोत्सुकांना विकायच्या, असे त्याने ठरवले. पैसेवाल्या नवरदेवांची माहीती घेण्यासाठी राजूने विवाह नोंदणी संस्था चालविणाऱ्या सोळंकीला हाताशी धरले. या संस्थेमार्फत बोहल्यावर चढू पाहाणाऱ्या श्रीमंत तरूणांसह ज्येष्ठांची माहिती राजूला मिळत गेली. त्यानंतर त्याने या तरूणांना मुली विकण्यास सुरूवात केली. ५० हजार ते दोन लाखांमध्ये राजू मुलींचा सौदा ठरवे. मिराबाई नोकरीचे आमिष दाखवून गरीब गरजू मुलींना गुजरातमध्ये आणत होती. तेथे आणल्यानंतर एका खोलीत मुलींचा सौदा केला जाई. अशाप्रकारे विवाह संस्थेच्या नावाखाली वंजूभाई पाच मुलींचा सौदा केल्याचे कबूल केले आहे. यातून मिळणाऱ्या पैशातून सिमा राजू प्रत्येकी २० हजार रुपये घेत होते.
१४ एप्रिल रोजी या आरोपींच्या तावडीतून सुटका करुन आलेल्या २२ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपींचे पितळ उघडे पडले. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ निरिक्षक सुनील कुवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी संजीव पारकर, एपीआय तुकाराम निंबाळकर, फौजदार स्मिता परब, हवालदार पाटील आणि पोलीस शिपाई दोरकर, जाधव या पथकाने शोध सुरु केला. सुरुवातीला गुजरात येथील बकराना गावातून तीन अल्पवयीन मुलींची सुटका करत, ग्राहक गणपत कोळीला अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ धुळे येथील साखळी गावातून मिराबाई साळवे, पती दिलीपी साळवेसह भाऊ लक्ष्मण पवारच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पुढे सुरत आणि अहमदाबाद येथून यामागील मास्टरमाईंड राजूसह सोलंकीलाही बेडया ठोकल्या गेल्या.

Web Title: Girls deal in the name of marriage board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.