Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई हादरली! वसतिगृहाच्या खोलीतच तरुणीची बलात्कार करून हत्या, आरोपीची आत्महत्या

By मनीषा म्हात्रे | Updated: June 7, 2023 00:34 IST

खोलीत आढळला विवस्त्र अवस्थेत मृतदेह, आरोपी सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबई : चर्नीरोड येथील एका वसतिगृहाच्या खोलीत १८ वर्षीय तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी समोर आली. सुरक्षा रक्षकानेच तरुणीवर बलात्कार करत तिची गळा दाबून हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. हत्येनंतर सुरक्षा रक्षकाने लोकल समोर येत आयुष्य संपविले आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी सुरक्षा रक्षक ओमप्रकाश कनोजिया विरुद्ध हत्येसह बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.

मूळची अकोला येथील रहिवासी असलेली १८ वर्ष २ महिन्याची तरुणी सावित्रीबाई फुले वसतीगृहात राहण्यास होती. तिचे वडील पत्रकार आहे. ती वांद्रे येथील एका नामांकित कॉलेज मध्ये पॉलिटेक्निकलच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होती. सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास तीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह वसतीगृहाच्या चाैथ्या मजल्यावरील खोलीत सापडला. या घटनेने वसतीगृहात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मरीन ड्राईव्ह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.      

तरुणीवर बलात्कार करून तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. याबाबत, पोलीस अधिक तपास करत आहे. सुरक्षा रक्षक सकाळपासून गायब असल्याने एक पथक सुरक्षा रक्षकाचा शोध घेत आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने पथक अधिक तपास करत आहे. सुरक्षा रक्षकाचा मोबाईल ही वसतीगृहातच मिळून आला आहे.  

... दोन दिवसांत जाणार होती गावी

 तरुणी मूळची अकोला येथील रहिवासी असून दोन ते तीन दिवसांत गावी जाणार होती. तसे तिकीट काढले असल्याची माहिती मिळत आहे.  अशी आली घटना उघडकीस अपर पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार,  मंगळवारी वसतीगृहात राहणाऱ्या तरुणीचा दरवाजा लॉक असून मुलगी कुठे आहे याबाबत काहीही माहिती नसल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा, खोलीतच मुलीचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह मिळून आला. तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वसतिगृहातील संशयास्पद व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

वडिलांचा कॉल अन् ... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे वडील सकाळपासून मुलीला कॉल करत होते. मात्र, मुलगी फोन घेत नसल्याने त्यांनी मैत्रिणीकडे विचारणा केली. त्यांनी मुलीचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. दरवाजाही बाहेरून लॉक होता. सायंकाळी ४ ते ५ च्या सुमारास पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी दरवाजाचा लॉक तोडून प्रवेश केला. तेव्हा मुलीचा मृतदेह मिळून आला. मुलगी पॉलिटेक्निकलच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होती. ... 

सुरक्षा रक्षकाची आत्महत्या 

 आरोपी सुरक्षा रक्षक कनोजीयाने सकाळी ६ वाजता चर्नीरोड स्थानका दरम्यान लोकल समोर येत आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येचे सीसीटिव्ही ताब्यात घेतले आहेत. त्याच्या वडिलांनीही त्याचा मृतदेह ओळखला आहे. त्याच्या खिशात दोन चावी मिळून आल्या आहेत. 

टॅग्स :गुन्हेगारी